मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदोलन करताच त्याची दखल घेण्यात आली आहे.
‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी प्रसिद्ध केलेल्या लेखामध्ये त्यांच्याबद्दल अनेक आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या आहेत, याबद्दल अनेक राजकीय संघटना, सामाजिक संस्थांनी शासनाकडे आक्षेप नोंदवले. या आक्षेपांची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेबसाईटवरील मजकूर तपासून त्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
महापुरुषांच्या बाबतीत लिखाण करताना ते अत्यंत अभ्यासपूर्ण असायला हवे, तसेच त्यामधून त्यांचा अवमान होणार नाही याची दक्षता लेखक किंवा प्रकाशन संस्थांनी घेणे गरजेचे आहे. महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांची शासन गय करणार नाही, असा इशारा देतानाच ‘इंडिक टेल्स’ वरील लेखात आक्षेपार्ह बाबी असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.
राष्ट्रवादीचे आंदोलन
क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्याबद्दल करण्यात आलेल्या आक्षेपार्ह लिखाणाच्या पार्श्वभूमीवर निवेदन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा. अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष मा. जयंतराव पाटील, माजी मंत्री मा. छगन भुजबळ, खासदार मा. सुनील तटकरे यांच्यासह पक्षाच्या इतर पदाधिकाऱ्यांनी मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली. क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ आणि ‘हिंदू पोस्ट’ वेबसाईटवर बंदी आणण्याची तसेच लेखकांवर व संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. तसेच मुंबई पोलिस आयुक्तालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, प्रदेश उपाध्यक्ष सुनिता शिंदे, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष राखी जाधव, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, युवक प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, मुंबई विभागीय महिला अध्यक्ष सुरेखा पेडणेकर, मुंबई विभागीय युवक अध्यक्ष निलेश भोसले, मुंबई विभागीय सामाजिक न्याय सेल अध्यक्ष सुनील शिंदे, मुंबई विभागीय अल्पसंख्याक सेल अध्यक्ष सोहेल सुभेदार, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Mumbai NCP Agitation CM Enquiry Order