मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधिमंडळ अधिवेशनात आज मुंबई-नाशिक महामार्गासह यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न चांगलाच गाजला. आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर सार्वजनिक बाधकाम मंत्री दादा भुसे यांनी उत्तर दिले. मात्र, येत्या ऑगस्ट पर्यंत ही स्थिती अशीच राहील, असे मंत्री भुसे यांनी सांगितले. त्यामुळे विरोधी आमदारांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भुसेंसह अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही टीका केली. नाशिक मुंबई रस्त्यावरील वाहतूक कोंडी तातडीने सोडवा, अशी आग्रही मागणी थोरात यांनी यावेळी केली.
विधानसभेत थोरात म्हणाले की, नाशिक मुंबई रस्ता वाहतूक कोंडीचा सापळा झाला आहे. काही मिनिटांच्या अंतरासाठी काही तासांच्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. या प्रश्नावर मंत्रिमहोदय सांगतात ऑगस्ट 2024 पर्यंत हा त्रास सहन करावा लागेल, हे अत्यंत असंवेदनशील आणि चुकीचे उत्तर आहे, नाशिक मुंबई रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर तातडीने मार्ग काढा. आमदार रईस शेख यांनी नाशिक मुंबई रस्त्यावरचा वाहतूक कोंडीचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता, तरी मंत्र्यांच्या उत्तराने या प्रश्नाचे गांभीर्य सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
भिवंडी बायपास ते ठाणे या प्रवासामध्ये प्रवाशांना दररोज वाहनांच्या लांबच लांब रांगांचा सामना करावा लागतो. मी देखील या रस्त्यावरून प्रवास करतो. जळगाव धुळे अहमदनगर आणि विदर्भ व मराठवाड्यातील बहुतांश जिल्हे याच मार्गावरून मुंबई मध्ये येतात. या रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याचीच झालेली आहे. मंत्री छगनराव भुजबळ, दादा भुसे अनिल पाटील हे मंत्री सुद्धा याच मार्गावरून प्रवास करतात. मला माहित नाही ते प्रवास करताना रस्त्याचा, रेल्वेचा, विमानाचा वापर करतात? मंत्री महोदयांसह छगन भुजबळ सुद्धा माझ्या या मताशी सहमत असते. आज तुम्ही तिकडे जाऊन बसलात नाहीतर तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर या विषयात आरडाओरडा केला असता.
एक दिवस मी सुद्धा दोन किलोमीटर पायी प्रवास या रस्त्याने केला होता. ॲम्बुलन्स मला या प्रवासात वाहतूक कोंडी मध्ये अडकलेल्या दिसल्या. वाहतूक कोंडीचा प्रश्न कोणत्याही सबबीवर सोडवावा लागेल, मंत्रिमहोदय उत्तरात सांगतात की, ऑगस्ट 2024 पर्यंत ही वाहतूक कोंडीची समस्या कायम राहील. मंत्री महोदय असे चालणार नाही हा प्रश्न गंभीर आहे. तुम्हाला तातडीने याच्यावर उपाययोजना कराव्या लागतील.
यावर मंत्री महोदय दादा भुसे यांनी, मी स्वतः मागील आठवड्यात या रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा आढावा घेतला आहे, तिथे ज्या ज्या उपायोजना कराव्या लागतील त्या उपाययोजना करून आठवडाभरात तुम्हाला तिथे किमान 50 टक्के बदल झालेला दिसेल असे सांगितले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंत्री महोदयांना सांगितले की, राज्यात अनेक ठिकाणी पायाभूत प्रकल्पांचे काम सुरू आहे. भविष्यात असे पायाभूत प्रकल्प करत असताना आपण पर्यायी व्यवस्था देखील उपलब्ध करून दिली पाहिजे त्या संदर्भात भविष्यात आपण काळजी घ्यावी अशा सूचना केल्या.
मंत्री दादा भुसे म्हणाले
वडपे ते ठाणे आठ पदरी रस्त्याचे काम भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने मंजूर केले आहे. या रस्त्याचे आठ पदरी रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने येथे वाहतूक कोंडी होत असून यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत सांगितले. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य रईस शेख, बाळासाहेब थोरात, अस्लम शेख, नाना पटोले यांनी उपस्थित केला होता.
मंत्री श्री. भुसे म्हणाले की, या रस्त्याचे काम जवळपास ३० टक्के पूर्ण होत आले आहे. उर्वरित काम ऑगस्ट २०२४ पर्यंत पूर्ण होईल. पावसाळ्याच्या काळात या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, वाहतूक सुरळीत राहील यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, पोलीस, परिवहन, महामार्ग, सर्व संबंधित यंत्रणांना या महामार्गावर नागरिकांच्या सोयीसाठी तातडीने उपयोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे अशा ठिकाणी ट्रॅफिक वॉर्डने तातडीने वाहतूक कोंडी सोडवण्यात यावी आणि रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्यात यावेत, अशा सूचनाही देण्यात येतील, असे मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.