मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबईत गेल्या काही दिवसांमध्ये अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सातत्याने घडणाऱ्या अपघातांमुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशातच एका अपघाताने अक्षरश: धडकी भरविली आहे. कारच्या धडकेमुळे स्कूटीचे तीन तुकडे झाले असून हा अपघात प्रत्यक्षदर्शींना हादरवून सोडणारा ठरला आहे.
मुंबईसह सर्वच मोठ्या शहरांमध्ये दररोज लहानमोठे अपघात होत असतात. विशेषत: मुंबईसारच्या महानगरांमध्ये कुठल्या ना कुठल्या भागात अपघात होऊन जखमी होण्याचे वा मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. वाहनचालकांच्या अरेरावी गाडी हाकटण्याचा फटका इतरांना बसत आहे. अशात मुंबईतील या अपघाताने अनेकांना गती आवरण्याचा संदेश दिला आहे. मुंबईतील मुलुंडमध्ये हिट अँड रनची घटना घडली आहे. भरधाव कारने स्कुटीला धडक दिली. यानंतर कारने पादचाऱ्याला धडक दिली. या भीषण अपघातात स्कुटीचालकाचा जागीच मृत्यू झाला. तर, पादचारी जखमी झाला आहे.
अपघातानंतर दुर्घटनाग्रस्त कार रस्त्यावर सोडून तरुण-तरुणी फरार झाले. हा अपघात इतका भीषण होता स्कुटीचे तीन तुकडे झाले आहेत. मुलुंडच्या देवी दयाल रोड परिसरामध्ये हा अपघात घडला आहे. हिट अँड रनची ही घटना आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, एक जण गंभीर जखमी झाला आहे. मुलुंडच्या देवी दयाल गार्डन परिसरामध्ये भरधाव वेगाने येणाऱ्या कारने सुरुवातीला स्कुटी चालकाला उडविले त्यानंतर याच परिसरातून रस्त्याच्या कडेने नाईट वॉक करणाऱ्या एका नागरिकाला या कारने धडक दिली. यानंतर ही कार थेट गुरुकृपा बिल्डिंगच्या गेटवर जाऊन धडकली.
अपघातानंतर कारमध्ये असलेले दोन तरुण आणि एक तरुणी घटनास्थळावरून फरार झाले. तर, एक तरुणी पळण्याच्या तयारीत असताना नागरिकांनी तिला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. या चौघांनी अमली पदार्थाचे सेवन केले असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
समृद्धी, विक्रोळी, भोरमध्येही अपघात
समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच असून शिर्डीहून मुंबईकडे जाणाऱ्या कारचा नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये अपघात झाला. आगासखिंड इथल्या पिलरचा कठडा तोडून कार थेट ४० फूट खाली कोसळली. यात तीन जण जखमी झाले आहेत. विक्रोळीत मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या उड्डाणपुलावर एक डंपर डिव्हायडला धडकून अपघात झाला. यात एका रिक्षाचाही अपघात झाला. तर भोरजवळील शिरगावच्या वरंध घाटात कार दरीत कोसळली. रस्त्याचा अंदाज न अल्याने अपघात झाला. यात कारचालक थोडक्यात बचावला.