मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकेकाळी जगातील अत्यंत वेगाने वाढणारे प्रचंड लोकसंख्येचे शहर आणि भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगर व आजूबाजूच्या उपनगरांमध्ये वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस भेडसावत आहे. वास्तविक पाहता शहरात अनेक मोठे रस्ते महामार्ग उड्डाणपूल त्याचप्रमाणे लोकल रेल्वे सेवा इतकेच नव्हे तर मोनो आणि मेट्रो रेल्वे सेवा आहे, तरीही ही समस्या अधिकच गंभीर बनली आहे, त्यातच आता मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्या मार्फत सुरू असलेल्या मेट्रो व मोनो रेल सेवा या संयुक्तपणे मासिक रुमारे ७० कोटी रुपयांच्या तोट्यात आहेत, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मार्चअखेरीस मेट्रोचा वार्षिक तोटा २८१ कोटी रुपये व मोनो रेलचा वार्षिक तोटा २४२ कोटी रुपये होता. मुंबईतील मेट्रो आणि मोनोरेल या दोन्ही सेवा तोट्यात असून, यात वडाळा- संत गाडगे महाराज चौक या मार्गावर धावणारी मोनोरेल येत्या वर्षाला सुमारे ५०० कोटी रुपयांनी तोट्यात आहे.
एमएमआरडीए लागले कामाला
खरे म्हणजे मुंबई शहरामध्ये कार्यरत असलेली मुंबई मोनोरेल ही आपल्या भारतातील पहिली मोनोरेल प्रणाली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एम.एम.आर.डी.ए.) ह्या सरकारी संस्थेने हा प्रकल्प विकसित केला आहे. २००९ साली मोनोरेलच्या बांधकामाला सुरुवात झाली व पहिल्या मार्गावरील चेंबूर ते वडाळा डेपो हा ८.९३ किमी लांबीचा पहिला टप्पा फेब्रुवारी २०१४ रोजी प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार होता. मात्र प्रत्यक्षात देशातील पहिली मोनोरेल ऑगस्ट २०१९ पासून मुंबईत धावू लागली आहे. मात्र सध्या मुंबईच्या पश्चिम उपनगरात नव्याने सुरू झालेल्या दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व आणि दहिसर पूर्व ते डी.एन. नगर या दोन्ही मेट्रोदेखील २३ कोटी रुपयांनी तोट्यात धावत आहेत. या आर्थिक वर्षात आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत. मोनो, मेट्रो मार्गिकांना असलेला तोटा भरून काढण्यासाठी नवीन महसुली मॉडेलसाठी एमएमआरडीएने काम सुरू केले आहे. अशाप्रकारे मार्गिका तोट्यात असल्यास तो दूर करण्यासाठी काय-काय उपाययोजना करायला हव्यात, यावर एमएमआरडीचा अभ्यास सुरू आहे. त्यानुसार या मार्गिकांसाठी पुढील दोन ते तीन महिन्यांत नवीन महसुली मॉडेल निश्चित केले जाईल, अशी माहिती मिळाली आहे.
उत्पन्नापेक्षा खर्च अधिक
मुंबईकरांची वाहतुकीची समस्या दूर करण्यासाठी मेट्रो रेलसह मोनोरेलची योजना आखण्यात आली होती. ही भारताच्या मुंबई शहरामधील जलद परिवहन रेल्वे प्रणाली आहे. मुंबई महानगरामधील वाढत्या वाहतूक समस्येवर उपाय तसेच सद्य मुंबई उपनगरी रेल्वेवरील ताण कमी करण्याचे मुंबई मेट्रोचे ध्येय आहे. जून २००६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान, मनमोहन सिंह, यांनी या प्रणालीच्या पहिल्या भागाचे भूमिपूजन केले होते. मेट्रोची वर्सोवा ते घाटकोपर दरम्यान धावणाऱ्या पहिल्या मार्गिकेचे उद्घाटन ८ जून २०१४ रोजी करण्यात आले. त्यानंतर सन २०१९ मध्ये रेल्वे, लोकल, मेट्रो आणि मोनो रेलची सुविधा असलेले मुंबई हे देशातील पहिले शहर बनले असून सर्वाधिक लांबीचा मोनो रेल मार्ग असलेले जगातील चार नंबरचे शहर बनले आहे. या नेटवर्कचा पहिला टप्पा ८.२ किमी चा होता आणि दुसरा टप्पा ११.२८ किमीचा आहे. आता स्वदेशी बनावटीच्या दहा गाड्या दाखल झाल्यानंतर एकूण १७ गाड्यांच्या माध्यमातून प्रति ४ ते ६ मिनिटाला एक फेरी उपलब्ध होईल, असे एमएमआरडीने स्पष्ट केले आहे. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असा हा प्रकल्प मानला जातो. मात्र मोनोरेल टिकवण्यासाठी भविष्यात या मार्गाला मेट्रो मार्ग जोडण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. मोनो रेलसाठी जवळपास २४६० कोटी रुपये खर्च करण्यात आले. तर कार्यान्वित झालेल्या दोन मेट्रोसाठी जवळपास १२ हजार ५०० कोटी रुपये खर्च करण्यात आला. मात्र, या तिन्ही मार्गिका आज प्रचंड तोट्यात आहेत. मोनोरेल व मेट्रो यांच्या या परिस्थितीमुळे नव्याने धावणाऱ्या मेट्रोला नफ्यात कसे आणायचे, अशी मोठी समस्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासमोर उभी आहे.
अत्यंत कमी महसूल
एमएमआरडीएचे माजी महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांच्या काळात नव्याने १० मोनोरेल आणण्याबाबत काम सुरू झाले होते. मात्र, आता तोट्यातल्या सर्व प्रकल्पांचा अभ्यास सुरू झाला आहे. सर्वाधिक तोट्यात मुंबई मोनो रेल आहे. मोनो रेलला २०२२-२३ या आर्थिक वर्षात ३१ मार्च, २०२३ अखेरीस तब्बल २४२ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. या संपूर्ण वर्षात प्रकल्पाला फक्त १३.४१ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला. तर यानंतर आता मार्गिकेसाठी ५८० कोटी रुपयांच्या नवीन गाड्यांच्या खरेदीचा प्रस्ताव आहे. आता चालू आर्थिक वर्षात या मार्गिकांचा मासिक खर्च हा ४२ कोटी रुपये अंदाजित आहे. त्या तुलनेत मिळणारा मासिक महसूल मात्र फक्त १९ कोटी रुपये असेल. यामुळे दरमहा किमान २३ कोटी रुपयांचा तोटा या मार्गिकांना होणार आहे.
Mumbai Monorail Metro Railway Loss MMRDA Passengers
Infrastructure Transport