मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वेबसिरीज आणि क्राईम पॅट्रोल बघून हत्याकांड घडविण्याच्या अनेक घटना गेल्या काही वर्षांमध्ये पुढे आल्या आहेत. दिल्ली, उत्तरप्रदेशमध्ये तर बरेचदा या घटनांची नोंद झाली आहे. मुंबईतील मीरा रोडवर घडलेले हत्याकांडही एक डॉक्युमेंट्री बघून घडविण्यात आले की काय, अशी शंका पोलिसांना येऊ लागली आहे.
मीरा रोड येथे राहणारा मनोज साने याने त्याची लिव्ह-इन पार्टनर सरस्वती वैद्य हिची अत्यंत क्रुरपणे हत्या केली. सरस्वतीचा गळा चिरून, तिचे तुकडे करून ते कुकरमध्ये शिजवणे आणि कुत्र्याला खायला देणे, हा प्रकार घृणास्पद असा आहे. मात्र असा प्रकार यापूर्वी कुठे घडला आहे का, याचाही विचार करण्यात आला. एवढ्या टोकाचा निर्णय आरोपीने घेतला कसा, असा प्रश्न तपास यंत्रणेला पडला. शेवटी इजिप्तमधील एका लघुपटात (डॉक्युमेंट्री) असेच हत्याकांड दाखविण्यात आल्याची बाब पुढे आली. या डॉक्युमेंट्रीमधील पात्र बदलली तर पूर्णपणे जसेच्या तसे हत्याकांड आरोपीने घडविल्याचे लक्षात येते. त्यामुळे मनोज साने याने डॉक्युमेंट्री बघून तर हत्याकांड घडविले नाही ना, अशी शंका निर्माण झाली आहे.
काय आहे डॉक्युमेंट्रीत?
इजिप्तमधील ही डॉक्युमेंट्री एका सत्य घटनेवरच आधारीत आहे. यूट्यूबवर ही डॉक्यूमेंट्री आहे. एक महिला रागाच्या भरात आपल्या नवऱ्याची हत्या करते. त्यानंतर पतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याचे तुकडे तुकडे करते आणि नंतर हे तुकडे शिजवते, असं या डॉक्युमेंट्रीत दाखवलं आहे. मनोज साने यानेही सरस्वतीच्या देहाचे तुकडे तुकडे केले. त्यानंतर ते शिजवले. नंतर ते भाजले. मिक्सरमध्ये ते बारीक केले आणि काही नाल्यात फेकून दिले तर काही कुत्र्यांना खायला दिले. डॉक्युमेंट्रीत जसं दाखवलं तसंच मनोजने केलं.
श्रद्धा हत्याकांडाची कॉपी
मनोजने इजिप्तची डॉक्युमेंट्री बघितली की नाही हे अद्याप चौकशीत पुढे येऊ शकलेले नाही. परंतु, त्याने दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडापासून प्रेरणा घेतल्याचे मात्र कबुल केले आहे. श्रद्धा वालकर हिचे तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवण्यात आले आणि त्यानंतर ते जंगलात फेकून देण्यात आले होते. पोलिसांनी मात्र दिल्लीतील प्रकाराची कॉपी असल्याची शक्यता नाकारली आहे.
Mumbai Mira Road Murder Manoj Sane Police Investigation