मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडापेक्षा भयानक हत्याकांड येथे घडले आहे. मीरा रोड परिसरातील आकाशगंगा सोसायटीत एका महिलेची अतिशय निर्घृणपणे हत्या केली. प्रेयसीच्या मृतदेहाचे तुकडे केले. पुरावे नष्ट करण्यासाठी प्रियकराने हे तुकडे प्रेशर कुकरमध्ये उकळले, काही तुकडे मिक्सरमध्ये कुटले. हेच तुकडे कुत्र्यांनाही खायला दिले. या धक्कादायक प्रकाराने पोलिसही हादरले आहेत.
केवळ एका चुकीमुळे संशयित प्रियकर पोलिसांच्या हाती लागला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून महिलेच्या मृतदेहाचे अनेक तुकडे जप्त केले आहेत. ही महिला सोसायटीतील तिच्या एका मित्रासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे. प्राथमिक तपासात महिलेचा गळा चिरून खून करण्यात आला असून नंतर तिच्या शरीराचे अनेक तुकडे करण्यात आल्याचे समोर आले आहे.
पोलिस उपायुक्त जयंत बजबळे यांनी सांगितले की, सरस्वती वैद्य (वय ३२ वर्ष) असे मृत महिलेचे नाव आहे. गेल्या तीन वर्षांपासून ती तिचा ५६ वर्षीय मित्र मनोज साहनी याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होती. आकाशगंगा सोसायटीत भाड्याच्या फ्लॅटमध्ये हे दोघे राहत होते. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सोसायटीच्या सातव्या मजल्यावरून महिलेचा विकृत मृतदेह बाहेर काढला.
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, महिलेची हत्या केल्यानंतर तिच्या शरीराचे अनेक तुकडे करण्यात आले. दुर्गंधी पसरू नये म्हणून आरोपीने मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये उकळले. मात्र, असे असतानाही विचित्र वासाने शेजाऱ्यांना त्रास झाला, त्यामुळे त्यांनी पोलिसांत तक्रार केली. संतप्त प्रियकराने प्रेयसीच्या मृतदेहाचे काही तुकडे कुत्र्यांनाही खायला घातले. तसे शेजाऱ्यांचे म्हणणे आहे.
आरोपी ताब्यात
चर्चगेटमध्ये तरुणीची होस्टेलमध्ये अत्याचार करुन हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मीरारोडमधील सोसायटीत घराचा दरवाजा उघडल्यानंतर पोलिसांना धडाचे अनेक तुकडे आढळून आले आहेत. पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले असून याबाबत पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
म्हणून केली हत्या…
शेजारच्या घरातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली. त्यानंतर पोलिस तेथे आले असता घराला कुलूप लावलेले होते. पोलिसांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला, तेव्हा त्यांना तिथे महिलेच्या मृतदेहाचे तुकडे आढळून आले. त्यातील काही अवशेष हे गायब करण्यात असल्याचे माहिती समोर आली आहे. सदर आरोपी आणि मृत महिला हे दोघे मागील अनेक महिन्यांपासून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते. त्यांच्यात कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत वाद आणि भांडणे होत होती. याच वादातून मनोजने तिची धारदार शस्त्राने हत्या केली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याचे लहान लहान तुकडे केले. काही तुकडे फेकून दिले. आरोपीने मृतदेहाची विल्हेवाट कुठे लावली याबाबतचा अधिकचा तपास पोलीस करत आहेत. मात्र या भयानक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Mumbai Mira Road Cruelty Murder Shocking