मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आजकाल चारचाकी गाड्या, बाईक्स उडवायची क्रेझ सगळ्यांनाच आहे. त्यातही त्या रेझ करत पळवायचा, लोकांना घाबरवायचं या गोष्टी तर सर्रास घडतात. महाविद्यालयीन विद्यार्थी तर यात एकदम आघाडीवर असतात. आणि त्यातही त्यांना कोणाचाही धाक नाही. त्यामुळे भरधाव गाड्यांवरील नियंत्रण सुटून अपघात होण्याचे आणि त्यात जीव जाण्याचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. अशी प्रकरणे देखील सातत्याने समोर येत असतात. यात अल्पवयीन मुलेही मागे नाहीत. अनेकदा तर आई वडीलच मुलांच्या हाती गाडी सोपवतात. तर काही वेळा मुले पालकांना न जुमानता नको ते स्टंट करताना दिसतात. मुंबईत नुकत्याच समोर आलेल्या एका घटनेमुळे हेच लक्षात येते आहे. एका अल्पवयीन मुलानं हौसेखातर गंमत म्हणून आपल्या वडिलांची गाडी चालवायला घेतली. पण त्याचं कारवरचं नियंत्रण सुटलं आणि झालेल्या अपघातात एक पुरुष आणि एक महिला अशा दोघांचा बळी गेला
गिरगाव चौपाटीजवळ घटना
या अपघातात बाईकचालक अकबर दाऊद खान (४७) आणि किरण अन्वर खान (३६) यांचा मृत्यू झाला. यातील अकबर खान यांचा अपघातस्थळीच तर किरण खान रुग्णालयात उपचार चालू असताना मरण पावल्या. दुर्दैव म्हणजे, अपघात झाला त्या दिवशी अकबर यांचा वाढदिवस होता. हे दोघेही वाढदिवस साजरा करून, वेळ घालवून परतत होते. तेव्हाच त्यांच्यावर काळाने घाला घातला.अकबर यांच्या
कसा झाला अपघात?
बुधवारी पहाटे आपल्या वडिलांची सेडान कार घेऊन एक अल्पवयीन मुलगा भोईवाड्याहून नरीमन पॉइंटच्या दिशेने निघाला. त्याच्या गाडीने गिरगाव चौपाटीनजीकच्या कॅफे आयडियलजवळ अकबर यांच्या बाईकला धडक दिली. या धडकेमुळे अकबर लांब फेकले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
पोलीस तपासात काय आढळलं?
पोलिसांच्या तपासात या गाडीत अल्पवयीन चालकासोबत आणखी एक अल्पवयीन मुलगा सापडला. मुळात या मुलाने आपण गाडी घेऊन जात असल्याचं घरी सांगितलंच नाही. तर त्याने आपण सायकल घेऊन जात असल्याचं सांगितलं होतं. त्यातच ही गाडी अनेक दिवसांपासून चालवली नसल्याने गाडीचे ब्रेक लागत नव्हते. याची माहिती देखील त्याला नव्हती. त्यामुळे ऐन वेळेला त्याला ब्रेक लावता आले नसल्याची माहिती मिळते आहे.
मुलाच्या पालकांवरही कारवाई होणार?
मुलगा अल्पवयीन असल्यामुळे नेमकी कुणावर आणि कशी कारवाई होणार, असा प्रश्न समोर येतो आहे. यासंदर्भात डी.बी. मार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलावर रॅश ड्रायव्हिंग आणि बेजबाबदार ड्रायव्हिंगचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या वडिलांवरही परवाना नसताना मुलाला कार चालवू दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अल्पवयीन मुलाला त्याच्या वडिलांकडे सोपवण्यात आलं असून चार्जशीट दाखल झाल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.