मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या म्हाडाचे घर भाजपच्या आमदाराला परवडत नसल्याची माहिती आहे. नुकतीच म्हाडाने घरांची सोडत काढली. त्यातील लोकप्रतिनिधींसाठी राखीव असलेल्या जागेवर बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांना ताडदेव येथील घर लागले. मात्र, त्या घराची किंमत साडेसात कोटी असून इतके पैसे नसल्याने कुचे यांनी म्हाडाच्या सोडतीत लागलेला हा बंगला सोडला आहे.
मुंबईच्या म्हाडाच्या ४०८२ घरांची सोडत करण्यात आली. ज्यात सर्वात महागड्या म्हणजेच ताडदेवमधील साडेसात कोटी रुपये किंमतीच्या घरासाठी काही राजकीय नेत्यांनी लोकप्रतिनिधी राखीव गटातून अर्ज केले होते. दरम्यान, नारायण कुचे यांना मुंबईत घर घ्यायचे होते, त्यासाठी त्यांनी देखील घरासाठी पाच अर्ज दाखल केले होते. या घरासाठी त्यांनी सर्वसाधारण व लोकप्रतिनिधी गटातून अर्ज दाखल केले होते. विशेष म्हणजे, कुचे यांनी क्रीसेंट टॉवरमधील ७ कोटी ५२ लाख ६१ हजार ६३१ रुपये किंमतीच्या घरासाठी २ अर्ज केले होते. दरम्यान, याची सोडत झाल्यावर आमदार नारायण कुचे यांची लॉटरी लागली आणि त्यांना क्रीसेंट टॉवरमधील सर्वात महाग घर मिळाले. तब्बल दीड हजार स्क्वेअर फुटाचे साडेसात कोटींचे हे घर आहे. पण लॉटरी लागल्यावर सुद्धा कुचे यांनी हे घर सोडले आहे.
पुरेसे कर्ज मिळत नसल्याचे कारण
पुरेसे कर्ज मिळत नसल्याने कुचे यांनी हे घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे भागवत कराड यांच्यासाठी कुचे यांनी घर सोडले असल्याची चर्चा होती. मात्र, भागवत कराडांसाठी नाही तर आर्थिक परिस्थिती कर्ज घेण्यासारखी नसल्याने घर सोडल्याची माहिती कुचे यांनी दिली आहे. तसेच मला दोन घर लागली होती, पण मी ते दोनही घरे सोडली असल्याचे कुचे म्हणाले आहेत. कुचे यांच्या या निर्णयाने भागवत कराड यांना घर मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Mumbai Mhada Flat BJP MLA Narayan Kuche Reject
Crore Home House