मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्या बालिश हट्टामुळेच मेट्रो कारशेडचे काम रखडल्यामुळे मुंबईकरांवर दहा हजार कोटींचा वाढीव बोजा पडल्याचे स्पष्ट झाले आहे. हा मुंबईद्रोह असून राज्याबद्दल उद्योगक्षेत्रात संशयाचे वातावरण तयार करून आता महाराष्ट्र द्रोह केला जात आहे, असा थेट आरोप प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी बुंधवारी केला. मेट्रोचे काम रखडवल्याबद्दल उद्धव व आदित्य या ठाकरे पितापुत्रांकडून दहा हजार कोटी वसूल करा, अशी मागणीही श्री.उपाध्ये यांनी यावेळी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश प्रवक्ते अतुल शाह यावेळी उपस्थित होते.
मेट्रो प्रकल्पाच्या व्यवहार्यतेचा कोणताही अभ्यास नसताना आणि कारशेड आरेमध्येच उभारणे योग्य असल्याचा अहवाल जाणीवपूर्वक दाबून ठेवून कारशेडच्या कामास स्थगिती देताना, मुंबईकरांना सुविधांपासून वंचित ठेवण्याचाच ठाकरे पितापुत्रांचा कट होता का, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. मेट्रो कारशेड आरेमध्येच उभारावी, असा स्पष्ट अहवाल मनोज सौनिक समितीने २०२० मध्येच ठाकरे सरकारला दिला होता. आता सर्वोच्च न्यायालयानेही आरेमध्ये मेट्रो कारशेड उभारण्यास हिरवा कंदिल दाखविल्याने ठाकरे यांच्या हट्टाचे पितळ उघडे पडले आहे.
वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्पाविषयीची वस्तुस्थिती याआधीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली आहे. घरातून सत्ता राबविण्याच्या उद्धव ठाकरेंच्या हट्टामुळेच महाराष्ट्रातून अनेक प्रकल्पांनी काढता पाय घेतल्याचे वारंवार स्पष्ट होऊनही ही जबाबदारी ढकलून महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचा आदित्य ठाकरेंचा प्रयत्न केविलवाणा आहे, असा टोला उपाध्ये यांनी मारला. आदित्य ठाकरे यांनी दाखवलेली कागदपत्रे फॉक्सकॉन महाराष्ट्रातून जाऊ नये यासाठी शिंदे – फडणवीस सरकारने केलेल्या प्रयत्नांची साक्ष देणारी आहेत. हा प्रकल्प महाराष्ट्रात व्हावा यासाठी उद्धव ठाकरे सरकारने केलेल्या प्रयत्नांचा पुरावा म्हणून आदित्य ठाकरे यांनी एक कागद तरी दाखवावा, असे आव्हानही श्री. उपाध्ये यांनी दिले.
राज्यात गुंतवणुकीसाठी योग्य वातावरण नाही असा गैरसमज उद्योगविश्वात पसरविण्याचा ठाकरे पितापुत्रांचा कट असून त्यासाठीच पुन्हापुन्हा बिनबुडाच्या कंड्या पिकविल्या जात आहेत. राज्यात सिनार्मस सारखे नवे प्रकल्प येत आहेत, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत, ७५ हजार पदे भरण्याची मोहीम शिंदे फडणवीस सरकारने हाती घेतली आहे, असेही श्री. उपाध्ये यांनी नमूद केले.
Mumbai Metro Car Shed Project Delay BJP Demand
Uddhav Thackeray Allegation Shivsena Politics