मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरलेल्या मेट्रो कारशेडचसाठी आता अतिरिक्त जागेची मागणी करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, राज्य सरकारने यापूर्वी उपलब्ध करून दिलेली जागा अपुरी पडत असल्यामुळे मुंबई महानगर विकास प्राधिकरणन अर्थात एमएमआरडीएने सात हेक्टर अतिरिक्त जागेची मागणी सरकारकडे केली आहे.
मुंबईतील मेट्रोला कायमच विरोध झाला आहे. त्यातल्या त्यात कारशेडसाठी तोडण्यात येणारी झाडे, जाणारी जागा याविरुद्ध माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह पर्यावरणप्रेमींनी विरोध दर्शविला आहे. अशात आता दिलेली जागादेखील अपूर्ण पडत असल्याच्या कारणास्तव अतिरिक्त जागेची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे कारशेडचा मुद्दा पुन्हा एकदा तापणार आहे. मेट्रो ६’मधील कारशेड कांजूरमार्ग येथील १५ हेक्टर क्षेत्रफळाच्या भूखंडावर उभारण्याचे प्रस्तावित असून राज्य सरकारने या जागेला २०१६ मध्ये हिरवा कंदील दाखविला होता.
मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ची कारशेड आरे वसाहतीतून कांजूरमार्ग येथे हलविण्यात आली. त्यानंतर या जागेवरून मोठा वाद निर्माण झाला. हा वाद थेट न्यायालयापर्यंत गेला आणि वादात ‘मेट्रो ६’ची कारशेडही रखडली. पण आता ‘मेट्रो ६’च्या कारशेडच्या जागेचा प्रश्न निकाली निघाला आहे. राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी कारशेडसाठी कांजूरमार्ग येथील १५ हेक्टर जागा एमएमआरडीएच्या ताब्यात दिली असून ‘मेट्रो ६’च्या कारशेडच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. आता लवकरच कारशेडच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.
एकात्मिक कारशेड रद्द
मेट्रो ६ ची प्रस्तावित कारशेड ज्या कांजूरमार्गच्या जागेवर आहे, त्याच कांजूरमार्गची ४१ हेक्टर जागा महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागितली होती. मेट्रो ६ सह ३, मेट्रो ४ आणि मेट्रो १४ चे कारशेड येथे एकात्मिक कारशेडच्या माध्यमातून बांधण्यात येणार होते. पण, शिंदे-भाजप सरकार येताच त्यांनी एकात्मिक कारशेड रद्द केले होते, हे विशेष.