मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील सुमारे ३८ हजार ८०० कोटी रुपयांच्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण, भूमीपूजन करण्यात आले. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या एक लाखापेक्षा जास्त लाभार्थींना मंजूर झालेल्या कर्जांच्या हस्तांतरणाचा प्रारंभ झाला. वांद्रे-कुर्ला संकुल येथील एमएमआरडीए मैदानावर हा कार्यक्रम झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. या दौऱ्यात मोदींनी मेट्रो मार्गिका २-अ आणि ७चे लोकार्पण केले.
मेट्रो रेल्वे मार्गिका २ अ आणि ७ चे लोकार्पण
प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते सुमारे १२ हजार ६०० कोटी रुपये खर्चाच्या मुंबई मेट्रो रेल्वे मार्गिका २ अ आणि ७ चे लोकार्पण झाले. यातील दहिसर पूर्व आणि डीएन नगर यांना जोडणारी मेट्रो मार्गिका २ अ ही सुमारे १८.६ किमी लांबीची आहे, तर अंधेरी पूर्व – दहिसर पूर्व यांना जोडणारी मेट्रो मार्गिका ७ सुमारे १६.५ किमी लांबीची आहे. सन २०१५ मध्ये या मार्गिकांची पायाभरणी देखील प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी केली होती. यावेळी प्रधानमंत्री मुंबई १ मोबाईल अॅप आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (मुंबई 1) चा प्रारंभ केला. सुलभ प्रवासासाठी हे ॲप उपयुक्त ठरणार असून मेट्रो स्थानकांच्या प्रवेशद्वारांवर ते दाखवता येईल आणि याच्या मदतीने युपीआय (UPI) द्वारे तिकीट खरेदी करता येईल. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (मुंबई 1) सुरुवातीला मेट्रो कॉरिडॉरमध्ये वापरले जाईल.
या मेट्रोची वैशिष्ट्ये आणि तिकीट असे
– दोन्ही मेट्रो मार्गांवर ३० रुपये एवढे कमाल भाडे आहे
– ३५ किमी मार्गासाठी ६० रुपये द्यावे लागतील.
– हे दोन्ही मेट्रो कॉरिडॉर हे घाटकोपर ते वर्सोवा दरम्यान धावणाऱ्या मेट्रो-३ कॉरिडॉरलाही जोडण्यात आले आहेत.
– या दोन्ही मेट्रो मार्गामुळे मुंबईकरांचा प्रवास आणखी सुलभ आणि सुखकर होणार आहे.
– अनेक तासांचा प्रवास काही मिनिटांवर येणार
– खासकरुन अंधेरी ते दहिसर दरम्यान राहणाऱ्या आणि या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
– सकाळी दहिसरहून मुंबईला येण्यासाठी साधारण एक ते दीड तास लागतो. मात्र, मेट्रोमुळे काही मिनिटात हा प्रवास होईल
– मेट्रोची सेवा उद्यापासून उपलब्ध असेल
हे आहेत मेट्रो स्टेशन्स
अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व
या मार्गावर गुंदवली, मोगरा, जोगेश्वरी पूर्व, गोरेगाव पूर्व, आरे, दिंडोशी, कुरार, आकुर्ली, पोईसर, मागाठाणे, देवीपाड, राष्ट्रीय उद्यान आणि दहिसर पूर्व हे मेट्रो स्टेशन्स आहेत.
अंधेरी पश्चिम ते दहिसर पश्चिम
या मार्गावर डीएन नगर, लोअर ओशिवरा, ओशिवरा, गोरेगाव पश्चिम, पहाडी गोरेगाव, लोअर मालाड, मालाड पश्चिम, वलणई, डहाणूकरवाडी, कांदिवली पश्चिम, पहाडी एकसर, बोरिवली पश्चिम, मंडपेश्वर आयसी कॉलनी कांदरपाड हे मेट्रो स्टेशन्स आहेत.
Mumbai Mero 2A and 7 Line Ticket and Details