विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर सध्या सोशल मिडियात भलत्याच ट्रोल होत आहेत. त्याचे कारण म्हणजे त्यांनी केलेलं ट्वीट. महापौर पेडणेकर यांनी लसीकरणासंदर्भातील एक बातमी ट्वीट केली होती. त्यात म्हटले होते की, मुंबई महापालिकेचा १ कोटी नागरिकांचं लसीकरण करण्याचा मानस आहे. त्यासाठी ९ कंपन्यांना काम मिळेल, असे म्हटले होते. त्याचवेळी एका व्यक्तीने ट्विटरवर प्रतिक्रीया देत त्यांना प्रश्न विचारला की याचे कॉन्ट्रॅक्ट कुणाला दिले आहे. मात्र, त्या व्यक्तीस उद्धटपणे उत्तर देत तुझ्या बापाला असे सांगण्यात आले. महापौरांकडून अशा भाषेचा वापर होणे योग्य नसल्याने महापौर पेडणेकर या सध्या सोशल मिडियात चांगल्याच लक्ष्य होत आहेत.
पेडणेकर यांचा खुलासा
यासंदर्भात महापौर पेडणेकर यांनी त्वरित खुलासा केला आहे. त्या म्हणाल्या की, माझा मोबाईल सतत माझ्याजवळ नसतो. माझ्या कार्यकर्त्याकडे असतो. संबंधित नागरिकाचा प्रश्न बघून कार्यकर्ता संतापला आणि त्याने त्वरित उद्धटपणे उत्तर दिले. जेव्हा मी मोबाईल हातात घेतला त्यावेळी मला ते दिसले. म्हणून तत्काळ मी ते ट्विट डिलीट केले. आणि त्या कार्यकर्त्याची मी हकालपट्टी केली आहे. जे झालं ते योग्य नव्हतं. अशा प्रकारे उद्धट वागणे चुकीचे आहे. माझे आजवरचे वर्तन असे नाही. त्याची जाणीव मुंबईकरांना आहे, असेही पेडणेकर यांनी म्हटले आहे.