मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोविड घोटळ्याप्रकरणात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कालच विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोविड घोटाळ्याप्रकरणी कुणालाच सोडणार नसल्याचे म्हटले होते. त्यानतंर आज हा गुन्हा दाखल झाला.
महापौर असतांना २ हजार रुपये किंमतीची बॉडी बॅग ६ हजार ८०० रुपयांना विकत घेण्यात आल्याच्या आरोपात हा गुन्हा दाखल झाल्याचे बोलले जात आहे. हे कंत्राट देताना महापालिकेतील काही अधिकाऱ्यांनी विरोध केला होता. त्यांचा हा विरोध डावलून हे कंत्राट देण्यात आल्याचाही आरोप आहे. त्याचबरोबर औषधांची खरेदी वाढीव दराने करण्यात आल्याचाही आरोप आहे.
या अगोदर सुजीत पाटकर यांना अटक करण्यात आली होती. आता किशोरी पेडणेकर यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला. त्यामुळे ठाकरे गटाला हा मोठा धक्का आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपले वर्चस्व रहावे यासाठी गेल्या काही महिन्यात सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर घोटाळ्याचे आरोप करत आहे. त्यात कोविडच्या काळातील घोटाळा शिंदे सरकारने रडारवर घेतला असून त्यात ठाकरे गटाला कोंडीत पकडले आहे.