मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – धार्मिक स्थळांवरील ध्वनिक्षेपकांचा मुद्दा आता चांगलाच तापला असून त्याचे राजकीय पडसादही दिसून येत आहेत. मशिदींवरील ध्वनिक्षेपक उतरवले नाहीत, तर अजाण सुरू असताना ध्वनिक्षेपकावर हनुमान चालिसा लावण्याचे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेले आहेत. त्या आदेशाची अंमलबजावणी मनसैनिकांनी आजपासून करण्यास सुरू केली आहे. मुंबईतील एका परिसरात बुधवारी पहाटे नमाजादरम्यान ध्वनिक्षेपकावर हनुमान चालिसा लावण्यात आली.
न्यूज १८ वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, मुंबईतील चारकोप परिसरात बुधवारी पहाटे पाच वाजता नमाज सुरू असताना मनसे कार्यकर्त्यांकडून एका निवासस्थानाच्या छतावर ध्वनिक्षेपकाद्वारे हनुमान चालिसा लावण्यात आली. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी मनसैनिकांची धरपकड सुरू केली आहे.
राज ठाकरे यांनी मंगळवारी सोशल माध्यमावर मनसैनिकांना आवाहन केले होते. त्यात ते म्हणाले, की मी सर्व हिंदूंना आवाहन करतो, की ४ मे रोजी ध्वनिक्षेपकावर अजाण ऐकली तर त्याच ठिकाणी ध्वनिक्षेपकावर हनुमान चालिसा सुरू करावी. तेव्हाच त्यांना ध्वनिक्षेपकाच्या त्रासाबद्दल कळू शकेल. सर्व स्थानिक मंडळांनी आणि सुजाण नागरिकांनी याविरुद्ध एक हस्ताक्षर मोहीम सुरू करावी. दररोज हस्ताक्षर केलेले निवेदन पोलिस ठाण्यात जमा करावे.
मशिदींमध्ये ध्वनिक्षेपकावर कोणी अजाण ऐकली, तर नागरिकांनी त्वरित १०० नंबर डायल करून तक्रार दाखल करावी. नागरिकांनी दररोज तक्रारी करायला हव्यात. हा धार्मिक नसून, सामाजिक मुद्दा आहे. ज्या मशिदींनी ध्वनिक्षेपक काढले असतील, त्यांच्या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो. ध्वनिक्षेपक बंद केलेल्या मशिदींना त्रास देऊ नये, असे आदेश त्यांनी मनसैनिकांना दिले आहेत.
दरम्यान, औरंगाबादमध्ये झालेल्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी मशिदींवरील ध्वनिक्षेपकाबद्दल केलेल्या प्रक्षोभक भाषणाची दखल पोलिसांनी घेतली असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य पोलिस महासंचालक म्हणाले, की या मुद्द्यावर त्यांच्याविरुद्ध योग्य ती केली जाईल. पोलिसांनी राज ठाकरे यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १५३, ११६, ११७ आणि महाराष्ट्र पोलिस अधिनियम तरतुदींंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.