मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी मुंबईत मंत्रालयात गेल्यावर आपले काम होईल, या अपेक्षेने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नागरिक वेगवेगळ्या कामांसाठी मंत्रालयासमोर गर्दी करतात. अनेक जाचक नियम असूनही मंत्रालयात प्रवेश मिळावा, यासाठी त्यांची खटाटोप सुरू असते. परंतु आता यापुढे मंत्रालयात होणाऱ्या प्रचंड गर्दीला आळा किंवा अटकाव घालण्यासाठी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच सर्वसामान्य जनतेची निवेदने आणि पत्रे स्वीकारली जाणार असून त्या ठिकाणी त्यांचे स्कॅनिंग करून संबंधित विभागात किंवा मंत्र्यांच्या खात्याकडे पाठविली जाणार आहेत. त्यानंतर लगेचच या पत्राची पोहच संबंधित नागरिकाला मिळणार आहे. महाराष्ट्र दिन म्हणजेच एक मे पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याचे सांगण्यात येते.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना तसेच संबंधित मंत्र्यांना पत्र देण्याच्या निमित्ताने तसेच त्यांचे शिफारस पत्र मिळविण्याच्या निमित्ताने दररोज हजारो नागरिक मंत्रालयात फेरफटका मारतात.विशेषतः मंगळवार-बुधवारी मंत्रालयात येणाऱ्यांची गर्दी अधिक असते. या दिवशी जवळपास दीड ते दोन हजार व्यक्तींना शिफारस पत्रावर मंत्रालयात प्रवेश दिला जातो, तसेच सर्वसामान्य परिस्थितीतही दीड ते दोन हजार व्यक्तींना मंत्रालयात प्रवेश दिला जातो. इतक्या अभ्यागतांना प्रवेश द्यायचाच असेल तर शिफारस पत्राचे सोपस्कार कशाला, असा प्रश्न आता केला जात आहे.
मुंबईत आधीच प्रचंड गर्दी त्यात मंत्रालयात मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी आणि दैनंदिन कामात येणारा अडथळा रोखण्यासाठी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर सेंट्रल रजिस्ट्री युनिट उभारले जात आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून ते सचिवांपर्यंत ३७ विभागांची दररोजची सुमारे ४० हजार पत्रे प्रवेशद्वारावरील याच युनिटमध्ये स्वीकारली जाणार आहेत. कारण मंत्रालय, नवीन प्रशासन भवन इमारतीत राज्यातील कानाकोपऱ्यांतून नागरिक आपली कामे मार्गी लागावीत म्हणून येत असतात. तसेच मंत्रीमंडळ बैठकीच्या दिवशी क्षेत्रिय पातळीवरील कार्यालयातून अधिकारी-कर्मचारी मंत्रालयात बैठकीसाठी येत असतात. त्या दिवशी मंत्रालयात प्रचंड गर्दी असते. तसेच बदल्यांच्या हंगामात विशेषतः मार्च, एप्रिल महिन्यांत मंत्रालयात भरपूर गर्दी असते. अशावेळी सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून काही नियमानुसार मंत्रालयात आणि नवीन प्रशासकीय भवनात प्रवेश दिला जातो.
सध्या मंत्रालयात तात्पुरत्या कामानिमित्त येणाऱ्यांना सध्या ‘गार्डन गेट’ येथूनच प्रवेश दिला जात आहे. कधी कधी या प्रवेशद्वारावर सकाळी ११ ते दुपारी १ च्या सुमारास येथे झुंबड उडालेली असते. प्रवेशाकरिता सगळ्यांची भिस्त मंत्री कार्यालयातून मिळणाऱ्या शिफारस पत्रावर असते. बरेचदा शिफारस पत्र नसेल तर प्रवेश मिळविणे सर्वसामान्यांकरिता जिकिरीचे बनते. येथील सर्व कार्यालयावरही या प्रक्रियेचा ताण येत आहे. अनेकदा मंत्र्यांच्या खासगी सचिवांना या कामासाठी कार्यालयात थांबून राहावे लागते. कारण, त्यांच्या सहीच्या पत्राशिवाय प्रवेश दिला जात नाही. त्यावर उपाय म्हणून या ठिकाणच्या खिडक्यांवर तत्काळ ही पत्रे स्कॅन होऊन थेट संबंधित विभागात पोहोचणार असून त्याचे ‘टोकन’ पत्र देणाऱ्या व्यक्तीच्या मोबाइलवर मिळणार आहे. १ मे महाराष्ट्रदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या यंत्रणेचा शुभारंभ होईल.
हजारो तक्रारी, अर्ज, निवेदने यांचा खच मंत्रालयात पडत असतो. या पत्रांचे विलगीकरण करून संबंधित विभागाला पाठविण्याचे आणि त्या पत्रांना उत्तर देण्याचे मोठे जिकिरीचे काम येथील टपाल विभागाकडून पार पाडले जाते. तसेच मंत्रालयाचा कारभार पेपरलेस करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्रीय टपाल यंत्रणा (सेंट्रल रजिस्ट्री युनिट) प्रवेशद्वारावर उभारली जात आहे. या विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यासाठी विशेष प्रयत्न करीत आहेत.
सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडून यासाठी ऑनलाइन यंत्रणा उभारली जात आहे. प्रवेशद्वारावरील सेंट्रल रजिस्ट्री युनिटमध्ये आल्यानंतर ज्या विभागातील खिडकीवर पत्र येईल ते अत्याधुनिक स्कॅनरवर तत्काळ स्कॅन हाेईल. त्यानंतर या पत्राचा टोकन नंबर तयार होईल, तो पत्र देणाऱ्या व्यक्तीच्या मोबाइलवर येईल. त्यानंतर या पत्राची स्कॅन कॉपी संबंधित विभागाकडे जाईल. त्यानंतर पत्रावर नेमकी काय कार्यवाही सुरू आहे, हे पत्र देणाऱ्या व्यक्तीला अगदी गावात बसूनही संबंधित वेबसाइटवर टोकन नंबर टाकताच कळणार आहे, असे सांगण्यात येते.
Mumbai Mantralay Work Big Changes Maharashtra Day