मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा ) -अपर वर्धा धरणग्रस्त समितीच्य आंदोलक शेतक-यांनी मंत्रालयातील संरक्षक जाळ्यांवर उड्या मारल्या. गेले अनेक दिवस हे आंदोलन सुरु आहे. पण सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सरकाचे लक्ष वेधण्यासाठी आज मंत्रालयातील दुसऱ्या माळ्यावरुन पाच ते सात शेतकऱ्यांनी जाळ्यांवर उड्या मारल्या. या जाळीमुळे शेतकऱ्यांचे प्राण वाचले असले तरी या आंदोलनामुळे खळबळ निर्माण झाली.
मंत्रालयामध्ये मंगळवार सकाळपासूनच एक मेडिकल कॅम्प सुरू होता. यावेळी अनेक शेतकरी उपस्थित होते. पण अचानक काही शेतकऱ्यांनी मंत्रालयाच्या जाळीवर धाव घेतली. त्यानंतर मंत्रालयात एकच खळबळ माजली. या आंदोलकांनी त्यांची सर्व परिपत्रकं खाली फेकण्यास सुरुवात केली. शासनाकडून हक्क्याच्या मोबादल्याची रक्कम मिळावी, प्रकल्पग्रस्तास शासनाची नोकरी मिळावी, अशा विविध मुद्द्यांसाठी मागचे १०३ दिवस हे आंदोलन सुरु आहे. आज ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार होते. मात्र त्यांना ही भेट न मिळाल्याने त्यांनी जाळ्यांवर उड्या मारल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे.
हे सर्व आंदोलक नागपूरहून आले आहेत. त्यांची मोठ्या प्रमाणात जमिन धरणाखाली गेली आहे. त्याचा कोणताच मोबदला मिळाला नाही. यामुळे ते त्रस्त होते. दरम्यान कृषीमंत्री दादा भूसे हे शेतकऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. या भेटीनंतर आता सरकार या या प्रश्नावर काय निर्णय घेते हे महत्त्वाचे आहे.
दरम्यान आमच्या मागण्यांकडे कोणी लक्ष देत नसल्यामुळे आम्ही हा आक्रमक पवित्रा घेतला असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यावेळी मंत्रालयात उपस्थित असल्याची माहिती देखील समोर येत आहे. त्यामुळे त्याचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही हा आक्रमक पवित्रा घेतला असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे.