विशेष प्रतिनिधी, मुंबई
गरजूंना न्याय देणे महत्त्वाचे असून त्यानुसार कोरोना प्रादुर्भावामुळे बंद असलेल्या मंत्रालयातील महिला बचत गटाचे उपाहारगृह सुरू करण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रशासनाला दिले.
राज्यमंत्री श्री. भरणे यांच्या अध्यक्षतेखाली महिला बचत गटाचे उपाहारगृह सुरू करण्याबाबत मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला सामान्य प्रशासन विभागाचे सह सचिव सोमनाथ बागुल, मंत्रालय सुरक्षाचे सहायक पोलीस आयुक्त मधुकर जवळकर, मंत्रालय सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता अशोक गायकवाड, गृह विभागाचे कक्ष अधिकारी बाबासाहेब खंदारे उपस्थित होते.
कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करूनच ‘टेक अवे’ या तत्वावर उपाहारगृह सुरू करण्याच्या सूचना श्री. भरणे यांनी यावेळी दिल्या. या निर्णयामुळे मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी आणि कामानिमित्त मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांची अल्पोपहाराची सोय होण्यास मदत होणार आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे देशभरात टाळेबंदी लागु करण्यात आल्याने अनेकांवर बेरोजगारी आणि उपासमारीची परिस्थिती ओढावली होती. त्यामध्ये उपाहारगृहातील कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. या निर्णयामुळे उपाहारगृहात काम करणाऱ्या महिलांचा रोजगार पुन्हा सुरू होईल, अशी भावना उपाहारगृह चालकांनी व्यक्त केली.