मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सरकार एखादा विभाग सुरू करते तेव्हा त्यामागे दोन उद्देश असतात, एकतर या विभागाच्या माध्यमातून विशिष्ट्य समाजाला लाभ मिळावा नाहीतर विशिष्ट्य लोकांना तरी लाभ मिळावा. सध्या राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘मित्रा’ नावाच्या विभागावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका होत आहे. दोन्ही अर्थांनी ही टीका होत आहे, हे महत्त्वाचे.
११ नोव्हेंबर २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेत महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) या विभागाची स्थापना केली. ठाण्यातील विकासक अजय आशर हे उपाध्यक्ष आहेत आणि ते एकनाथ शिंदे यांचे मित्र आहेत. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या आकडेवारीचे विश्लेषण करणे, त्यांच्यात समन्वय निर्माण करणे आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियनवर नेण्याबरोबरच प्रकल्पांवर काम करण्यासाठी ‘मित्रा’ची स्थापना करण्यात आली. ‘मित्रा’ यांचे पहिले कार्यालय १२०० चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या नवीन प्रशासन इमारतीत होते.
जुनी जागा कामासाठी अपुरी पडत असल्याने नवीन कार्यालयासाठी मित्राच्या वतीने शासनाकडे मागणी करण्यात आली होती. आता ‘मित्रा’चे नवे कार्यालय मुंबईतील सर्वात महागड्या नरिमन पॉइंट भागात असलेल्या निर्मल भवनात स्थलांतरित करण्यात आले आहे. मित्राच्या नवीन कार्यालयाचे एकूण क्षेत्रफळ ७९२० चौरस फूट असून या नवीन कार्यालयासाठी राज्य सरकारने दरमहा २१,३८,४०० रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे दरवर्षी या कार्यालयाच्या भाड्यात ५ % ने वाढ केली जाणार आहे. यावरुन आता विरोधकांनी टीका केली आहे. विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांना व उपमुख्यमंत्र्यांना विषयावरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
काय म्हणाले वडेट्टीवार?
मुख्यमंत्र्यांच्या मित्राच्या नवीन कार्यालयासाठी राज्य सरकार महिन्याला तब्बल २१ लाख रुपये म्हणजे वर्षाला २ कोटी ५६ लाख रुपय भाडे देणार असून ही सरकारी पैशांची उधळपट्टी आहे. मंत्रालयासमोर असलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीत जागा कमी पडत असल्याचे कारण पुढे करत सरकारने हा निर्णय घेतला, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
Mumbai Maharashtra Government MITRA Office Rent Expenses