मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहर पुर्वी सर्वांसाठी सुरक्षित मानले जात होते. अगदी तरुण मुली आणि महिला देखील एकट्याने कुठेही प्रवास करू शकत होत्या. मात्र अलीकडे काही दिवसांमध्ये महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढल्याने त्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अगदी धावत्या लोकलमध्ये देखील एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. धावत्या लोकल ट्रेनच्या महिला डब्ब्यात आरोपीने मुलीवर अत्याचार केला. सदर पीडित तरुणी परीक्षेला जात असताना हा प्रसंग ओढावला. आरोपीला घटनेनंतर आठ तासात अटक करण्यात आली आहे.
म्हणून आरोपीने काढला पळ…
मुंबई नगरी सुरक्षित मानली जाते. मुंबईत रात्री एक वाजता देखील महिला लोकल ट्रेनमध्ये एकटी प्रवास करु शकते आणि सुरक्षिततेसाठी महिलांच्या डब्यात पोलीस तैनात असतात. मात्र, या घटनेमुळे लोकल गाड्यांमधील महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हार्बर मार्गावरील मस्जिद बंदर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) या स्थानकादरम्यान काल सकाळी ७.२८ वाजता हा भीषण प्रकार घडला. पीडित तरुणी मुंबईतील गिरगाव इथली रहिवासी असून ती नवी मुंबईतील बेलापूर येथे एका परीक्षेला जात होती. सीएसएमटी-पनवेल लोकल ट्रेनच्या सेकंड क्लास डब्यातून ती प्रवास करत होती. ट्रेन सुरु होताच आरोपी नवाज करीम (वय ४०) डब्ब्यात चढला. मुलगी एकटीच प्रवास करत असल्याचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यावेळी तरुणीने स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरडा सुरु केल्यानंतर आरोपीने मस्जिद बंदर स्थानकावर उतरुन पळ काढला.
सीसीटीव्ही फुटेजमुळे अटक
या घटनेनंतर तरुणीने आरओरडा करताच प्रवासी जमा झाले, त्यानंतर सदर तरुणीने रेल्वे सुरक्षा दलाकडे जाऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. लगेच आरपीएफ, जीआरपी, क्राईम ब्रान्च आणि मुंबई पोलिसांनी पथके तयार करुन आरोपींचा शोध सुरु केला. पोलिसांनी मस्जिद बंदर स्थानकात बसवलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फूटेज तपासून त्या व्यक्तीची ओळख पटवली. घटनेच्या ८ तासांनंतर दुपारी चारच्या सुमारास आरोपीला अटक करण्यात आली. सदर आरोपी रोजंदारी करणारा असून विकृत मनोवृतीचा आहे. पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी केली जात आहे. त्याला उद्या गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्याला कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे.