मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबईकरांसाठी लोकल प्रवास हा नित्याचा आहे. लोकल पकडण्यासाठी होणारी धावपळ, गर्दी होत असते. नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लोकल प्लॅटफॉर्मवर कधी येणार हे माहीत असतं. पण ती लोकल कुठपर्यंत आली हे माहीत नसतं. म्हणजे लोकलचे लोकेशन त्यांना समजू शकत नाही. त्यामुळे अनेकदा प्रवाशांची तारांबळ उडते. आता मात्र प्रत्येक प्रवाशाला लोकलचं लोकेशन ट्रॅक करता येणे शक्य होणार आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी यात्री मोबाइल ॲप्लिकेशनवर ही सुविधा उपलब्ध करुन दिली असून मध्य रेल्वेतील लोकल ट्रेनच्या थेट लोकेशनची माहिती या ॲपवर मिळू मिळणार आहे.
ट्रेन येण्यास विलंब झाला की ती कधीपर्यंत स्टेशनवर येईल याची स्पष्ट माहिती प्रवाशांना मिळत नाही. त्याची शोधाशोध करण्यात प्रवाशांचा नाहक वेळ जातो. या ॲपमुळे हे सगळं टळू शकणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांच्या उपस्थितीत नुकतेच या वैशिष्ट्याचे प्रात्यक्षिक पार पडले.
मुंबई विभाग विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोयल, मुख्य वाणिज्य व्यवस्थापक इती पांडे यांच्यासह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते. यात्री ॲप दैनंदिन उपनगरीय प्रवाशांसाठी रेल्वेची माहिती मिळविण्यासाठी आणि त्यांच्या प्रवासाचे नियोजन करता यावे यासाठी उपयुक्त माध्यम आहे. कोणत्याही कारणांमुळे किंवा मेगाब्लॉक इत्यादींमुळे रेल्वे सेवा विस्कळीत होण्याच्या काळात ट्रेन रद्द करणे किंवा विशेष गाड्या चालवल्याबद्दल त्यांना माहिती मिळू शकते, असं महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी सांगितलं. लोकल ट्रेन्सचे अपडेट, उपनगरीय गाड्यांचे तिकिट भाडे तपशील, स्त्रोत आणि गंतव्य स्थाने प्रविष्ट करुन प्रवासाचे नियोजन, मेल एक्सप्रेस ट्रेनची माहिती, आवडत्या गाड्या आणि मार्गांवर अलर्ट सेट करणे आदी माहिती मिळू शकणार आहे.
प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे उत्तम नियोजन करण्यासाठी ‘यात्री’ हे एक मोबाइल ॲप्लिकेशन मदतीचे ठरणार आहे. सर्व उपनगरीय रेकवर स्थापित जीपीएस उपकरणे आणि लोकल ट्रेनचे रिअल टाइम लोकेशन मिळवण्यासाठी विकसित केलेला अल्गोरिदम वापरकर्त्यांना नकाशावर थेट ट्रेनचे ठिकाण पाहण्यास आणि ट्रेनचे चिन्ह हलताना पाहण्यास मदतीचे ठरणार आहे. ही सगळी माहिती दर १५ सेकंदांनी ऑटो रिफ्रेश होणार आहे.
Mumbai Local Passengers New Facility