मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबईत धावत्या लोकलमध्ये परीक्षेला निघालेल्या विद्यार्थीनीवर एका नराधमाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या गुन्ह्यावरुन राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष तशा खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. गृहखात्याच्या निष्क्रियतेमुळे मुंबईत महिला-तरुणी असुरक्षित असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
अजित पवार म्हणाले…
ही घटना अत्यंत संतापजनक आहे. गेल्या काही दिवसात राज्यात महिलांवरील अत्याचारात झालेली वाढ चिंताजनक असून गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे, अशा तीव्र शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संताप व्यक्त करत या घटनेचा निषेध केला आहे. दरम्यान या घटनेचा युध्दपातळीवर तपास पूर्ण करुन सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर हलगर्जीपणाची चौकशी करण्याची मागणी अजित पवार यांनी केली आहे.
मुंबईत लोकलच्या हार्बर मार्गावर धावत्या लोकलमध्ये सकाळच्या वेळेत विद्यार्थीनीवर अत्याचाराची घटना घडली. परीक्षेला जात असताना विद्यार्थीनीसोबत सकाळी साडे सातच्या सुमारास हा प्रकार घडला. गेल्या काही दिवसांत राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये झालेली वाढ चिंताजनक असून गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. ही घटना घडली त्या लोकलच्या महिला डब्यांमध्ये पोलीस सुरक्षा व्यवस्था का नव्हती ? याला कोण जबाबदार आहे ? सुरक्षा व्यवस्था असती तर एका विद्यार्थीनीवरील हा गैरप्रसंग टाळता आला असता असेही अजित पवार म्हणाले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष तशा खासदार सुप्रिया सुळे यांनीही यासंदर्भात प्रतिक्रीया दिली आहे. त्या म्हणाल्या की, चालू लोकलमध्ये महिलांच्या डब्यात चढून एका व्यक्तीने तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली. ही अतिशय संतापजनक घटना आहे. यामुळे पुन्हा एकदा मुंबई लोकलच्या सुरक्षेचा प्रश्न पुढे आला आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नसून याला गृहखात्याची निष्क्रियता कारणीभूत आहे. या घृणास्पद घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी तपासयंत्रणांनी कार्यवाही करणे गरजेचे आहे.