मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील प्रसिद्ध असलेल्या लालबागचा राजा गणपती मंडळाच्या एका कृतीवर छत्रपती संभाजीराजे संतापले आहेत. मंडळाने शिवमुद्रेशी छेडछाड केल्याचे सांगत रोष व्यक्त केला आहे.
मुंबईतील लालबागचा राजा मंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा अपमान केल्याचा आरोप मराठा क्रांती महामोर्चाने केला आहे. याबाबत मराठा क्रांती महामोर्चाने लालबागचा राजा मंडळाविरोधात मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. मंडळाने शिवाजी महाराजांची राजमुद्रा लालबागच्या राजाच्या पायावर ठेवल्याचा आरोप आहे. यावर संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली. माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले,‘लालबागचा राजा मंडळाने जे केलं ते आज सकाळी माझ्याही कानावर आले. मात्र, त्यांनी दुरुस्ती केलेली आहे. त्यांनी दुरुस्ती केली असेल, तर हा विषय संपवुया असं मला वाटतं. त्यावेळी मराठा क्रांती महामोर्चाची मागणी रास्त होती. असे काही केले की भावना दुखावतात. एवढ्या मोठ्या मंडळाने असे बारकावे नेहमी पाहणे गरजेचे आहे. अशी कुठलीही गोष्ट करू नये ज्यामुळे सर्वांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात.’
-हा तर शिव अनुयायांचा अवमान
मराठा क्रांती महामोर्चाचे अमोल जाधवराव मुंबई पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हणाले,‘छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा लालबाग राजाच्या पायावर दाखवण्यामागील मंडळाचा नेमका हेतू काय होता हे आम्हा शिव अनुयायांना कळत नाही. परंतु त्यांनी शिवराजमुद्रा लालबागच्या राजाच्या पायी छापून संपूर्ण शिव अनुयायांचा अवमान केला आहे.’
Mumbai Lalbag Raja Mandal Rajmudra Insult Complaint