कल्याण (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजप आणि शिंदे गटात सुरू झालेल्या कल्याण-डोंबिवलीतील वाद अद्याप संपलेला नाही. जागावाटपावरून सुरू झालेली शाब्दीक चकमक अजून थांबलेली नाही. दोन्ही बाजूने एकमेकांवर हल्ले करण्यात येत आहेत. अशात आता भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना लक्ष्य केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून कल्याणमध्ये भाजपा आणि शिवसेना ( शिंदे गट ) यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे हे राज्यातील भाजपा कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करण्याचं काम करत आहेत, असा आरोप कल्याण पूर्वचे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी केला होता. आता पुन्हा आमदार गणपत गायकवाड यांनी श्रीकांत शिंदे यांना लक्ष्य केले आहे. ‘एकदा लोकसभेची निवडणूक होऊद्या. तुमच्या प्रत्येक आरोपांचे उत्तर देणार,’ असा इशारा गणपत गायकवाड यांनी अप्रत्यक्षपणे श्रीकांत शिंदे यांना दिला आहे.
कल्याण जिल्हा भाजपातर्फे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची पत्रे वाटप आणि कार्यकारिणी निवडीचा कार्यक्रम रविवारी पार पडला. यावेळी गपणत गायकवाड बोलत होते. तेव्हा मंत्री रवींद्र चव्हाणही उपस्थित होते. गणपत गायकवाड म्हणाले,‘त्यांच्याकडे धनुष्यबाण असले तरी माझ्याकडेही आता रॉकेट आहेत. तेही आता चांगले काम करुन बाणाला उत्तर देऊ शकतात. मला छेडण्याचा प्रयत्न केला तर मी जशास तसे उत्तर देईन.’
हवे तेवढे आरोप करा
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला निधी आणत मंजूऱ्या मी घेतल्या. पण, तिथेही श्रेय घेण्यासाठी काहीजण पुढे आले. आपल्याला निवडणुकीत परत त्यांच्याबरोबर फिरायचं असल्याने काही गोष्टी बोलत नाही. एकदा लोकसभेची निवडणूक होऊद्या. माझ्यावर जेवढे आरोप करायचे आहेत, तेवढे करा. तुमच्या प्रत्येक आरोपाचं उत्तर देण्याची ताकद माझ्यात आहे. तुम्ही मला उत्तर देऊ शकणार नाही, एवढे पुरावे माझ्याकडे आहेत, असेही गणपत गायकवाड यांनी म्हटले आहे.
Mumbai Kalyan Politics MP Shrikant Shinde BJP MLA