मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने या नावाभोवती वैद्यकीय क्षेत्रात जे वलय आहे, त्याला छेद देणारे आरोप सध्या त्यांच्यावर होत आहेत. डॉ. लहाने यांनी जे. जे. रुग्णालयात विनापरवानगी शस्त्रक्रिया केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मात्र आता या आरोपाची पडताळणी करण्यासाठी जी समिती नेमण्यात आली आहे, त्या समितीने एक धक्कादायक बाब मांडली आहे.
अॉगस्ट ते डिसेंबर २०२२ या कालावधीत डॉ. लहाने यांनी कोणत्याही पदावर असताना जे.जे. रुग्णालयात विनापरवानगी डोळ्यांच्या शस्त्रक्रिया केल्या, असा त्यांच्यावर आरोप आहे. जे.जे. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांच्या अध्यक्षतेत त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून या समितीने प्राथमिक अहवाल सादर केला आहे. या अहवालात डॉ. लहाने यांचे पाय अधिक खोलात असल्याचे स्पष्ट होत आहे. अवघ्या चार महिन्यांच्या आत डॉ. तात्याराव लहाने यांनी जे.जे. रुग्णालयात कुठल्याही पदावर नसताना ६९८ शस्त्रक्रिया केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
डॉ. लहाने यांनी आपण सर्व शस्त्रक्रिया नियमांच्या चौकटीत केल्याचे म्हटले आहे. आपल्या शस्त्रक्रियांमुळे लोकांना दृष्टी मिळाली आहे. त्याचे कौतुक तर सोडा, किमान राजकारण तरी करू नका, असे डॉ. लहाने यांनी म्हटले आहे. तर समितीच्या अध्यक्ष जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता पल्लवी सापळे यांनी आपण अद्याप अहवाल बघितला नाही, त्यामुळे काहीही बोलू शकत नाही, असे म्हणत सावध भूमिका घेतली आहे.
या कालावधीत शस्त्रक्रिया
डॉ. तात्याराव लहाने यांनी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेच्या संचालकपदावरून निवृत्त झाल्यानंतर आणि राज्य सरकारच्या अंधत्व निवारण मोहिमेच्या समन्वयकपदी नेमणूक होण्यापूर्वी डॉ. लहाने यांनी या शस्त्रक्रिया केल्याचे पुढे आले आहे. नेत्ररोग विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख यांना कोणत्या आदेशात हा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे.
सरकारचा आदेश
राज्य सरकारने आदेश दिल्यानंतरच मी काम सुरू केले होते, असे डॉ. तात्याराव लहाने यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात आपली कुठलीही चौकशी झालेली नाही आणि कशाबद्दलही विचारणा झालेली नाही, असेही डॉ. लहाने यांनी म्हटले आहे.