मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्वसामान्य रुग्णांना माफक दरात सर ज. जी. (जे.जे.) रुग्णालयात यकृत रोपण सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. सर ज.जी.रुग्णालयात विविध विषयांवर आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले, जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे उपस्थित होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले की, ग्रॅण्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर ज. जी. समूह रुग्णालये, मुंबईची स्थापना १५ मे, १८४५ रोजी झाली. जे. जे. रुग्णालयात महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून येणाऱ्या गरीब आणि गरजू रुग्णांवर गुणवत्तापूर्ण उपचार केले जातात. जे. जे. रुग्णालयात १,३५२ बेड्स असून १०० आयसीयू बेड्स आहेत. या ठिकाणी रुग्णांना यकृत रोपण सुविधा उपलब्ध करुन दिल्यानंतर मुंबईसह राज्यातील सर्वसामान्य रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
मंत्री मुश्रीफ यांनी सर ज. जी. रुग्णालय भायखळा येथील आवारात अतिविशेषोपचार रुग्णालयात उपचारासाठी बहुमजली इमारतीच्या बांधकामाची पाहणी करुन ही इमारत नियोजित वेळेत पूर्ण करावी. बांधकाम गुणवत्तापूर्ण करण्यासाठी दक्ष रहावे. या ठिकाणी करण्यात येणाऱ्या सोयी सुविधा दर्जेदार करुन घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना दिल्या.
ग्रॅण्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज. जी. समूह रुग्णालये, मुंबई येथे ऊरः शल्यचिकित्साशास्त्र विभाग (CVTS) (कार्डिओ व्हॅस्कूलर थोरॅसिक सर्जरी) व कक्षाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले आहे. जे. जे. रुग्णालयातील एम.बी.बी.एस.च्या विद्यार्थ्यांसाठी असणारी वसतिगृहे चांगली करण्याची अनेक वर्षांची मागणी आता पूर्ण होणार आहे. या रुग्णालयाच्या परिसरातील मुलांचे वसतिगृह आणि आर. एम. भट वसतिगृहाच्या डागडुजीसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने मंजुरी दिली असल्याचेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. रुग्णालयात सुरू असलेल्या विविध योजनांचा यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी सविस्तर आढावा घेतला.
Liver transplant facility will be available in this hospital at moderate cost.
Mumbai JJ Hospital Medical Treatment New Facility Soon
Minister Hasan Mushrif