मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – यंदा आयपीएलचा बहुतांश सिझन मुंबईत खेळला जाणार आहे. ७० सामन्यांपैकी मुंबईतल्या वानखेडे आणि डी.वाय.पाटील मैदानावर प्रत्येकी २० आणि मुंबईतल्याच ब्रेबाॕर्न मैदानावर १५ असे सर्वाधीक सामने मुंबईत तर पुण्यात १५ सामने अशी आयपीएलची कार्यक्रम पञिका निश्चित आहे.
सहाजिकच मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांचा कडक उन्हाळा, उकाडा, हवेतील आर्द्रता आणि संध्याकाळनंतर हिरवळीवर पडणारे दव आयपीएलवर भारी पडणार याचे संकेत चेन्नई सुपर किंग्ज वि.कोलकाता नाईक रायडर्स यांच्यातील पहिल्याच सामन्यात बघायला मिळाले. कर्णधार रविंद्र जाडेजासह ब्राव्हो, दुबे, सेन्टनर यांच्या कमरेला अडकवलेले आणि चेंडू पुसून ओले झालेले नॕपकीन्स हा ड्यु फॕक्टर यंदाच्या सिझनमध्ये घातक ठरणार असेच सांगत होते.
पुढे जे सामने डे नाईट खेळवले जाणार आहेत त्या सामन्यात ड्यू फॅक्टर खूप निर्णायक ठरू शकेल अशी दाट शक्यता वाटू लागली आहे. मागचे दोन्ही सीजन हे दुबई, अबुधाबी किंवा शारजात खेळले गेले. तिथली कडक उष्णता आणि रात्री उशिरा गवतावर पडणारे दव, यामुळे टॉस जिंकल्यानंतर विरुद्ध संघाला प्रथम फलंदाजी देण्याची रणनिती अनेक सामन्यात वापरली गेली. टाॕस जिंकल्यानंतर जास्तीत जास्त कर्णधारांनी हीच रणनीती वापरली. आता मुंबईतल्या वातावरणाचा अनुभव लक्षात घेता हाच ‘ड्यु फॅक्टर’ आयपीएल वर भारी पडणार आहे हे निश्चित.