मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२२च्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या पराभवानंतर रोहित शर्माला आणखी एक धक्का बसला आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याच्या संघाने निर्धारित वेळेत ओव्हर पूर्ण केले नसल्याने हा दंड ठोठावला गेला आहे.
“आयपीएलच्या आचारसंहितेअंतर्गत किमान ओव्हर-रेटच्या गुन्ह्याशी संबंधित हा त्यांच्या संघाचा हंगामातील पहिला गुन्हा आहे,” असे आयपीएलने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे रोहितला कर्णधार म्हणून १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे आयपीएल २०२१मध्येही दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यानंतर रोहित शर्माला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता. त्या सामन्यातही तेच कारण होतं.
अक्षर पटेल आणि ललित यादव यांच्या नाबाद भागीदारीमुळे दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सवर १० चेंडू राखून ४ विकेट्सनी विजय मिळवला. १७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सने १८.२ षटकांत ६ बाद १७९ धावा केल्या. ललितने ३८ चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद ४८ धावांची खेळी केली. त्याचवेळी अक्षर पटेलने १७ चेंडूंत २ चौकार आणि तीन षटकारांसह ३८ धावा केल्या. ललित आणि अक्षर यांनी ३० चेंडूत ७५ धावांची नाबाद भागीदारी केली. मुंबई इंडियन्सचा बेसिल थंपी चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. त्याने ४ षटकात ३ बळी घेतले. दिल्ली कॅपिटल्सच्या कुलदीप यादवने ४ षटकांत १८ धावा देत ३ बळी घेतले. त्याला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले