इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – क्रिकेट आवडत नाही असा माणूस सापडणे कठीणच आहे. जगभरात हा खेळ लाडका आहे. भारतात तर या खेळाडूंना प्रचंड प्रेम मिळतं. त्यांचे चाहते, प्रेक्षक त्यांना फॉलो करत असतात. आता आयपीएल २०२३ चा सीझन सुरू झाला आहे. आयपीएलच्या १६व्या हंगामामुळे सर्वत्र चैतन्याचे वातावरण आहे. मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवही आपल्या संघात सहभागी झाला आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सने सूर्याचा एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो आपल्या हॉटेल रूमचा पासवर्ड विसरल्याचे दिसत आहे.
हॉटेल रूमचा पासवर्ड विसरल्यावर मोठी गंमत घडली. व्हिडिओमध्ये सूर्या त्याच्या खोलीकडे जातो आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो, पण दरवाजा उघडत नाही. त्याने सांगितलेला प्रत्येक पासवर्ड चुकीचा होता. गंमत म्हणजे सूर्याने बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांतील डॉयलॉग म्हणत दार उघडण्याचा प्रयत्न केला. पण, दरवाजा काही उघडला नाही. शेवटी सूर्या ‘सुपला शॉट’ म्हणतो आणि दरवाजा उघडतो.
मुंबई इंडियन्सने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, “पासवर्ड खूप छान आहे, पण उशिरा लक्षात आला.” या व्हिडिओमध्ये सूर्याचा दमदार अभिनय पाहायला मिळाला. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत ११ लाखांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे, तर सुमारे ८ हजार लोकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दिग्गज खेळाडू विराट कोहलीपासून ते शिखर धवनपर्यंत सर्वांनीही या व्हिडिओवर कमेंट केली आहे. कोहलीने हसणारा इमोजी कमेंट केली. याशिवाय शिखर धवननेही हसणाऱ्या इमोजीसह कमेंट केली. दोन्ही खेळाडूंना सूर्याचा अभिनय खूप आवडला आहे.
Mumbai Indians Cricket Player Suryakumar Yadav Hotel Video