मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोणताही गुन्हेगार असला तर त्याला आपला गुन्हा नाही, हे सिद्ध करण्यासाठी कायद्याची मदत दिली जाते. परंतु एका चोरी प्रकरणात एका संशयित गुन्हेगाराला चोऱ्यांच्या गुन्ह्यांमध्ये कायदेशीर मदत मिळालीच नाही, अखेर न्यायालयाच्या मदतीने त्याची तब्बल ८३ वर्षाची शिक्षा कमी करण्यात आली. सदर तरुणाला त्याच्यावर दाखल ४१ पैकी ३८ चोरीच्या प्रकरणांमध्ये कायदेशीर मदत मिळाली नसल्याचे आणि त्यानंतरही त्याला या गुन्ह्यांत ८३ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्यावर उच्च न्यायालयाने बोट ठेवले. तसेच याप्रकरणी हस्तक्षेप नाही केला तर ती न्यायाशी प्रतारणा ठरेल, असे मत व्यक्त करून न्यायालयाने या तरुणाची या प्रदीर्घ शिक्षेतून सुटका केली आहे.
हायकोर्टाची नाराजी
असे म्हणतात की, ‘भगवान के घर देर है अंधेर नही, ‘त्याचप्रमाणे ‘न्यायप्रक्रियेला विलंब लागला तरी न्याय मिळतोच, ‘ असेही म्हटले जाते. पुण्यातील एका तरुणाच्या बाबतीत असेच घडल्याने याचा प्रत्यय आला असे म्हटल्यास वागे ठरणार नाही. कारण अस्लम सलीम शेख (वय ३०) हा चोरी प्रकरणाच्या गुन्ह्यात दि. ३ मार्च २०१४ रोजी अटक झाल्यापासून तुरुंगात होता. अखेर या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी झाली, तेव्हा त्याच्या याचिकेवर निर्णय देताना न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांनी उपरोक्त आदेश दिला. गुन्ह्याची कबुली दिल्यास त्याची तुरुंगातून सुटका केली जाईल, असे शेख याला सांगण्यात आले होते, याकडेही खंडपीठाने लक्ष वेधले. तसेच, शेख याला कायदेशीर मदत उपलब्ध केली नव्हती, याबाबतही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. असा प्रकार घडल्याने वकील आणि न्याय क्षेत्रातही त्याची चर्चा सुरू आहे.
विविध प्रकरणांमध्ये शिक्षा
खरे म्हणजे शेख याने अनेक गुन्हे केले असले तरी सुरुवातीच्या काळात तेव्हा तो अल्पवयीन होता, त्याचाही विचार करण्यात आला नाही, असे नंतर निदर्शनास आले त्यामुळे शेख याच्यावरील उर्वरित तीन गुन्ह्यांमध्ये त्याला शिक्षा सुनावताना गुन्ह्याच्या वेळी तो अल्पवयीन असल्याची कनिष्ठ न्यायालयाने तसदी न घेतल्याबाबतही न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले. शेख याला पुण येथे दाखल झालेल्या चोरीच्या गुन्ह्यात पहिल्यांदा अटक करण्यात आली होती. त्यानंतर इतर ४० चोरीच्या गुन्ह्यांमध्ये ११ पोलीस ठाण्यांनी त्याला अटक केली. शेख याच्यावर त्याच्यावरील ४१ गुन्ह्यांमध्ये खटला चालवण्यात आला आणि त्याला या सगळय़ा गुन्ह्यांत दोषी ठरवले गेले. तसेच त्याला सहा महिने ते तीन वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
आता यात सूट मिळाल्याने शेख याला दिलासा मिळाला आहे.