मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच झापले आहे. मुंबई पोलिसांच्या कारवाई विरोधात राणा दाम्पत्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. दाखल झालेल्या दोन वेगवेगळ्या एफआयआर रद्द कराव्यात, अशी मागणी करणाची याचिका राणा दाम्पत्याने दाखल केली होती. त्याची सुनावणी आज झाली. मात्र, या सुनावणीत न्यायालयाने राणा दाम्पत्यालाच फटकारले आहे.
मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्या विरोधात २ एफआयआर दाखल केले आहेत. सामाजिक तेढ निर्माण करुन कायदा व सुव्यवस्था बाधित करण्यासाठी आणि पोलिसांना असहकार्य करुन त्यांच्याशी हुज्जत घातल्या प्रकरणी. एकाच घटनेचे हे दोन्ही एफआयआर रद्द करावे, अशी मागणी राणा यांच्या वकीलाने केली. मात्र, तसे करता येणार नाही. दोन्ही एफआयआर वेगवेगळ्या कारणांशी संबंधित आहेत, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
कायद्याचे पालन करीत असल्याचे तुम्ही सांगता मग पोलिसांना सहकार्य का केलं नाही, त्यांच्या कामकाजात अडथळा का निर्माण केला. आपण लोकप्रतिनिधी आहात. त्यामुळे त्यानिमित्ताने आपल्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य याचे भान आपण ठेवणे आवश्यक आहे. पण, तसे झालेले दिसत नाही, असे स्पष्ट मत न्यायालयाने मांडले. आपण पोलिसांना विरोधाऐवजी सहकार्य करायला हवे होते, असेही न्यायालयाने राणा दाम्पत्याला सुनावले. तसेच, राणा यांची याचिकाही न्यायालयाने फेटाळली आहे.