नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात कार्यरत न्यायमूर्ती रोहित देव यांनी भरकोर्टात स्वत:च्या राजीनाम्याची घोषणा केली. आजवरच्या इतिहासात अशा प्रकारे स्वत:चा राजीनामा घोषित करण्याची ही पहिलीच वेळ मानली जात आहे.
न्यायमूर्ती रोहित देव यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात न्यायमूर्ती म्हणून सेवा देत होते. गेल्या वर्षी प्राध्यापक जी. एन. साईबाबा यांची नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या खटल्यातून मुक्तता करणाऱ्या घटनापीठाचे ते सदस्य होते. सर्वोच्च न्यायालयाने हाच आदेश रद्दबातल ठरवून या प्रकरणाची पुन्हा सुनावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १० ऑगस्टपासून या प्रकरणाची पुन्हा सुनावणी सुरू होणार आहे. २०१७मध्ये न्यायमूर्ती रोहित देव यांची उच्च न्यायालयाच्या खंडपीठावर नियुक्ती करण्यात आली होती. त्याआधी ते सरकारी वकील होते.
दीड वर्षांनंतर, अर्थात ४ डिसेंबर २०२५ रोजी त्यांचा सेवाकाल समाप्त होणार होता. मात्र. त्याआधीच त्यांनी राजीनामा दिल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. प्राप्त माहितीनुसार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी निकटचे संबंध असलेल्या देव यांची रवानगी अलाहबाद हायकोर्टात करण्यात आली होती. त्यामुळे ते नाराज होते. परिणामत: त्यांनी राजीनामा देणचा निर्णय घेतला. परंतु, याबाबत कुणीही अधिकृतरित्या पुष्टता केलेली नाही.
सर्वांची मागितली माफी
न्यायमूर्ती रोहित देव यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा करतानाच भर कोर्टात माफीही मागितली. ‘आपण सर्वांनी इथे काम करताना खूप मेहनत घेतली. माझ्या मनात तुमच्या कुणाबद्दलही राग किंवा वाईट भावना नाही. पण मी जर अनवधानाने तुम्हा कुणाला दुखावले असेल, तर त्यासाठी मी आपली माफी मागतो’, असे न्यायमूर्ती देव राजीनाम्याची घोषणा करताना म्हणाले.
mumbai high court nagpur bench judge rohit deo resign legal open court