मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख तथा आमदार बच्चू कडू यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. नाशिक महापालिकेच्या तत्कालिन आयुक्तांवर हल्ला केल्याप्रकरणी कडू यांना नाशिक न्यायालाने १ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली होती. त्यास कडू यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर आज सुनावणी झाली. यात उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने कडू यांना दिलासा दिला आहे. तसेच, कडू यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.
बच्चू कडू माजी मंत्री आहेत. तसेच त्यांनी एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा दिला आहे. नाशिक महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांना शिवीगाळ आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांनी २०१७ मध्ये कडू यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.
अपंग व्यक्तींसाठी राखीव निधीचा वापर न करण्याच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या निदर्शकांसोबत कडू होते. कडू व इतर आंदोलक सदस्य कृष्णा यांनी महापालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवन येथे आयुक्त कृष्णा यांच्यासोबत बैठकीसाठी गेले होते. त्यावेळी आयुक्त आणि कडू यांच्यात वाद झाला. त्यानंतर कडू यांनी आयुक्त कृष्णा यांना शिवीगाळ केली व त्यांच्यावर हात उगारला होता. यानंतर कडू यांच्यावर गुन्हा दाखल झाला. तसेच, नाशिक न्यायालयात याप्रकरणी खटला चालला.
नाशिक सत्र न्यायालयाने याप्रकरणी कडू यांना दोषी ठरविले. भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३ (लोकसेवकावर प्राणघातक हल्ला किंवा फौजदारी बळाचा वापर) आणि ५०४ (हेतूपूर्वक अपमान) नुसार शिक्षापात्र गुन्हा केल्याबद्दल दोषी ठरवले होते. कडू यांना एक वर्ष सश्रम कारावास आणि ठराविक रक्कम दंड भरण्याची शिक्षा सुनावण्यात आली होती.
त्यानंतर कडू यांनी शिक्षेला स्थगिती देण्याची विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात केली. न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर त्याची सुनावणी झाली. कडू यांच्या वकीलाने बाजू मांडली. त्यानंतर खंडपीठाने सांगितले की, “शिक्षेचे स्वरूप अत्यल्प असल्याने, या न्यायालयाने अपीलाचा निर्णय प्रलंबित ठेवला आहे. त्यामुळे शिक्षा स्थगित करण्यास पात्र आहे. अपीलकर्ता पीआर बाँडवर २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामिनावर मुक्त होण्यास पात्र आहे. न्यायालयाने कडू यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याची याचिका निकाली काढली आहे. तसेच, त्यांचे अपील नंतर सुनावणीसाठी येणार आहे.
Mumbai High Court MLA Bachhu kadu Petition