मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चारचाकीचा टायर फुटून वाहनचालकाचा मृत्यू होणे, ही बाब विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळण्यास पात्र असल्याचे सांगत संबंधित पीडित कुटुंबाला सव्वा कोटी देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला.
मकरंद पटवर्धन नामक व्यक्तीचा २५ ऑक्टोबर २०१० रोजी अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या कारचा टायर फुटल्यामुळे त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे अपघात होऊन त्यांचे निधन झाले. यासंदर्भात कार इन्शुरन्स कंपनीकडे भरपाई मागितल्यानंतर त्यांनी ही भरपाई देण्यास नकार दिला. तक्रारदाराकडून मागण्यात आलेली नुकसानभरपाईची रक्कम खूप जास्त आहे. शिवाय, अपघातामध्ये कारचा टायर फुटणे हा अॅक्ट ऑफ गॉड आहे. त्याचा मानवी चुकीशी काहीही संबंध नाही.
अॅक्ट ऑफ गॉड प्रकारात मोडणाऱ्या घटनांसाठी विमा कंपन्यांकडून कोणतंही संरक्षण किंवा नुकसानभरपाई दिली जात नाही, असा दावा विमा कंपनीकडून करण्यात आला. विमा कंपनीने केलेल्या दाव्याला पीडिताच्या कुटुंबाने न्यायालयात आव्हान दिले. विमा कंपनी पैसे देण्यास टाळाटाळ करीत आहे आणि निरर्थक कारणं सांगत आहे, असे पीडितांच्या कुटुंबीयांनी न्यायालयाला सांगितले.
न्यायालयाचा आक्षेप
विमा कंपनीच्या दाव्यावर न्यायालयाने आक्षेप नोंदविला. ‘अॅक्ट ऑफ गॉड’ म्हणजे अशा नैसर्गिक घटना ज्यावर मानवाचे कोणतेही नियंत्रण नसते. यामध्ये अनेक अनपेक्षित नैसर्गिक घटनांचा समावेश होतो, ज्या घटनांसाठी माणूस जबाबदार नसतो, असे स्पष्ट करीत न्यायालयाने विमा कंपनीच्या भूमिकेवर आक्षेप नोंदवला.
हा अॅक्ट ऑफ गॉड नाही
टायर फुटणे हा काही अॅक्ट ऑफ गॉड होत नाही. हा मानवी दुर्लक्षाचा प्रकार आहे. टायर फुटण्यासाठी अतीवेग, टायरवरील उच्चदाब, तापमान वाढ अशा अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात, असे न्यायालयाने म्हटले.
Mumbai High Court Insurance Company Compensation Road Accident