मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पत्नीला वेडी आहे असे म्हणणे वा तुला काही अक्कल नाही असे संबोधणे हा मानसिक अत्याचार ठरत नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई हायकोर्टाने दिला आहे.
पत्नीने पतीवर केलेले मानसिक आणि शारीरिक शोषणाचे आरोप मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळले आहेत. ‘तुला अक्कल नाही, तू वेडी आहेस,’ ही मराठी भाषेत सर्रास वापरली जाणारी वाक्ये पतीने म्हणणे म्हणजे मानसिक अत्याचार नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले. कौटुंबिक न्यायालयाने नाकारल्यानंतर पतीने याविरोधात उच्च न्यायालयात अपील केले होते. त्यावर हायकोर्टाने हा निकाल दिला आहे. पती आपलं शारीरिक आणि मानसिक शोषण करतो, असा आरोप पत्नीने उच्च न्यायालयात केला होता. दरम्यान कोर्टाने पतीला घटस्फोट मंजूर केला आहे.
न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने म्हटले की,‘जेव्हा घरात मराठी बोलतात तेव्हा असे उच्चार सर्रास होतात. तुला अक्कल नाही, तू वेडी आहे, असे म्हणणे म्हणजे कोणत्याही परिस्थितीत मानसिक शोषण समजलं जाऊ शकत नाही. शिवाय ही वाक्य शिवीच्या श्रेणीतही येऊ शकत नाहीत.’
असा होते आरोप-प्रत्यारोप
पती रात्री उशिरा घरी येतो आणि अपमानित करण्याच्या उद्देशाने आपल्यावर ओरडायचा, असे पत्नीने न्यायालयात म्हटले होते. यावर न्यायालयाने म्हटले की, पतीचे असे वर्तन दर्शवणाऱ्या प्रमुख घटनांचा पत्नीने उल्लेख केलेला नाही, ज्यावरुन समजू शकेल की पती पत्नीचे शोषण करत होता. दुसरीकडे पतीने आरोप केला आहे की,”माझे संयुक्त कुटुंब आहे आणि हे आपण लग्नापूर्वीच सांगितले होते. आपण एकत्र कुटुंबात राहणार आहोत, हे पत्नीला आधीच माहित होते. परंतु लग्नानंतर तिने याबाबत तक्रार करण्यास सुरुवात केली. तिला वेगळे राहायचे आहे. ती आपल्या आई-वडिलांचा आदर करत नाही आणि त्यांची काळजी घेत नाही. शिवाय तिने घर देखील सोडले आहे.”
Mumbai High Court Husband Wife Dispute Molestation
Remark Divorce