मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अनेक वेळा केवळ एकाची निवड करावी लागते, त्यामुळे अनेक तरुणी तथा महिला मूल झाल्यावर करिअरचा विचार सोडून देतात, परंतु कोणत्याही महिलेसाठी करिअर किंवा मूल असा एकच विचार करून चालणार नाही, असे मत खुद्द न्यायालयाने व्यक्त केले आहे. एका निकाला संदर्भात उच्च न्यायालयाने हा निर्वाळा दिला आहे. महिलेला तिचे मूल आणि करिअर यापैकी एकाची निवड करण्यास सांगितले जाऊ शकत नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले.
प्रेम विवाह असो किंवा ठरवून केलेले लग्न, बंधने आलीच. मग आई-वडिलांच्या परवानगीनेच ती स्वीकारायला लागतात, साहजिकच आजच्या काळात तरुणांसाठी करिअर महत्त्वाचे असते, त्यानंतर लग्न परंतु वाढत्या वयाबरोबर तरुणींना मात्र करिअर सांभाळतानाच लग्न करावे लागते. पुढे साहजिकच मूल झाल्यावर करिअर आणि मुल दोन्ही सांभाळावे लागते.
आपल्या नोकरीच्या निमित्ताने दोन वर्षांसाठी अल्पवयीन मुलीसह पोलंडला जाण्याची याचिकाकर्तीला न्यायालयाने परवानगी दिली. पत्नी नऊ वर्षांच्या मुलीला घेऊन पोलंडला गेली, तर मुलीला भेटता येणार नाही, असे सांगून याचिकाकर्तीच्या विभक्त पतीने तिला पोलंडला जाण्यास विरोध केला होता. पुण्यातील कुटुंब न्यायालयानेही त्याचा हा विरोध योग्य ठरवला होता. त्यामुळे याचिकाकर्तीने उच्च न्यायालयात धाव घेऊन या निर्णयाला आव्हान दिले.
मात्र या प्रकरणात माहिलेच्या याचिकेवर निर्णय देताना महिलेला तिचे मूल आणि करिअर यापैकी एकाची निवड करण्यास सांगितले जाऊ शकत नाही, असे न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी नमूद केले. तसेच कुटुंब न्यायालयाचा निर्णय रद्द केला. मुलगी आणि वडिलांमधील प्रेम, जिव्हाळा, आपुलकी समजण्यासारखी; परंतु नोकरीची संधी नाकारू शकत नाही. याचिकाकर्ती परदेशी नोकरी करण्यास इच्छुक असून तिला संधीपासून वंचित ठेवता येणार नाही, असेही न्यायालयाने नमूद केले.
याचिकाकर्ती ही मुलीची आई आहे आणि तिच्या जन्मापासून सतत तिच्यासोबत राहिली आहे आणि ती नोकरी करणारी स्त्री असूनही, तिने काम आणि मुलाची काळजी आणि आपुलकी यांच्यात समतोल राखला आहे. मुलीचे योग्य संगोपन होईल याचीही तिने काळजी घेतली आहे. मुलांचे त्यांच्या पालकांसह स्थलांतर होणे असामान्य नाही. नोकरी करणाऱ्या महिलेने तिच्या जबाबदाऱ्यांमुळे आपल्या मुलाला बालसंगोपन केंद्रात सोडणे देखील असामान्य नाही. त्यामुळे पतीचा दावा मान्य करता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
Mumbai High Court Decision Women Career and child