मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पत्नी माहेरच्यांशी तासनतास बोलत राहते म्हणून तिच्या बोलण्यावर बंधन घालणे ही क्रुरता असल्याचे निरीक्षण हायकोर्टाने एका प्रकरणावरील सुनावणीदरम्यान नोंदविले आहे.
वैवाहिक नातेसंबंधामुळे पत्नी तिच्या पालकांपासून वेगळी होऊ शकत नाही. पत्नीकडून तिच्या पालकांशी संबंध तोडण्याची अपेक्षा केली जाऊ शकत नाही, पत्नीने माहेरच्यांसोबत संपर्कात राहु नये, असा तगादा लावणे ही मानसिक क्रुरता असल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले. एका घटस्फोट प्रकरणात हायकोर्टाने हे मत नोंदवले आहे. न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने ६ सप्टेंबर रोजी हे निरीक्षण नोंदवले आहे. याशिवाय आधुनिक काळात नवरा-बायको दोघांनीही घरातील जबाबदाऱ्या समानतेने उचलल्या पाहिजेत, असेही कोर्टाने सांगितले आहे.
एका ३५ वर्षीय व्यक्तीचे २०१० मध्ये लग्न झाले. लग्नाच्या ८ वर्षानंतर म्हणजेच २०१८ मध्ये त्याने कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला होता. बायको नेहमी तिच्या आईसोबत फोनवर बोलते, घरातील कामे करत नाहीत, असा दावा त्याने आपल्या अर्जामध्ये केला होता. दुसरीकडे याचिकाकर्त्याच्या पत्नीने असा दावा केला होता की, मी ऑफिसवरून घरी आल्यानंतर नवरा मला घरातील सर्वच कामे करायला भाग पाडत होता. तसेच तो माझ्या आई-वडिलांसोबत देखील फोनवरून बोलू देत नव्हता, तसेच त्यांना भेटूही देत नव्हता. यावेळी महिलेने तिचे शारीरिक शोषण झाल्याचा दावाही केला. पती-पत्नीच्या या वादावर कौटुंबिक न्यायालयाने सुनावणी घेतली. दोघांचेही म्हणणे व्यवस्थित ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने याचिकाकर्त्या व्यक्तीचा अर्ज फेटाळून लावला. दरम्यान, कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाला सदरील व्यक्तीने मुंबई हायकोर्टात आव्हान दिले.
घरातील कामांची जबाबदारी दोघांचीही
दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर पत्नीने माहेरच्यांसोबत संपर्कात राहु नये, असा तगादा लावणे ही मानसिक क्रुरता असल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले. त्याचबरोबर घरातील कामांची जबाबदारी पती-पत्नी दोघांचीही आहे, असे म्हणत घटस्फोटाची याचिका फेटाळून लावली.
Mumbai High Court Couple Husband Wife Dispute Family
Phone Call Conversation