मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हार्टअटॅक (हृदयरोग), कॅन्सर (कर्करोग) टीबी (दमा) यासारख्या गंभीर आजारांनी अनेक देशांना ग्रासले आहे. भारतात देखील या आजारांचे प्रमाण वाढले आहे. परंतु मुंबई शहरात या संदर्भातील स्थिती चिंताजनक असल्याचे दिसून येते. यासंदर्भातील आकडेवारी पाहता मुंबईकरांनी आता सावध होण्याची गरज आहे.
कोरोनानंतर हृदय रोगाच्या समस्या चिंतेचा विषय ठरत आहे. जगभरात एक तृतीयांश लोकांचा मृत्यू हृदयविकाराशी संबंधित आहे. वयाची साठी गाठल्यानंतर कर्करोग किंवा इतर गंभीर आजारांच्या तुलनेत हृदयविकाराची शक्यता ३ पटीने वाढते. परंतु, गेल्या काही वर्षांच्या आकड्यांप्रमाणे हृदयविकार केवळ वृद्धांनाच नव्हे, तर युवकांना देखील मोठ्या प्रमाणात झाले आहेत. मुंबईत रोज हार्ट अटॅकमुळे २६ जणांचा मृत्यू झाल्याची ही माहिती आहे. तर कर्करोगाने रोज मुंबईत २५ लोकांचा मृत्यू झाला आहे. माहितीच्या अधिकारात २०२२ ची ही माहिती उघड झाली आहे.
हृदयविकार चिंतेची बाब
हृदयविकाराचा झटका म्हणजे हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यां मधून रक्तप्रवाह कमी किंवा बंद होणे यामुळे संबंधित भागातल्या स्नायूंचे पेशीसमूह मरतात. हे अचानक होत असल्याने त्याला ‘झटका’ असा शब्द पडला आहे. हृदयस्नायूचा जास्त भाग निकामी झाला तर हृदयक्रिया बंद पडून रुग्ण दगावण्याची शक्यता असते. तसेच कॅन्सर अर्थात कर्करोग आजही एक जीवघेणी समस्या आहे. कर्करोग कोणालाही आणि कसाही होऊ शकतो आणि कुठल्या विकारामुळे किती मृत्यू सन २०२२ मध्ये झाले? यासंदर्भातली माहिती ही माहितीच्या अधिकारात मागवण्यात आली होती.
अशी आहे आकडेवारी
कोव्हिडमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी होताना दिसले. मात्र हार्ट अटॅकमुळे दररोज २६ मुंबईकरांना जीव गमवावा लागला आहे अशी माहिती समोर आली. हार्ट अटॅकप्रमाणेच टीबी म्हणजेच क्षय रोगामुळेही मुंबईत बहुतांश मृत्यू झाल्याची माहितीही समोर आली आहे. सन २०२२ मध्ये क्षयरोगाची बाधा झालेल्या ३ हजार २८१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २०१८ मध्ये ही संख्या ४ हजार ९४० इतकी होती. तसेच हृदयविकार आणि त्यामुळे होणारे मृत्यू हा मुंबईकरांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे असे के.ई.एम रुग्णालयाचे डॉ. प्रफुल्ल केरकर यांनी सांगितले.
कारणे, निदान आणि उपाय
जागतिक स्तरावरील सर्वेक्षणात हार्ट अटॅकमुळे होणारे मृत्यू वाढलेले दिसून आहेत. तरुणांमध्ये हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. चालणे कमी, सकस आहार नसणे, घरातून बाहेर पडल्यावर की एसी वाहनांनी प्रवास करणे अशी अनेक कारणे तसेच बदलेली जीवनशैली या सगळ्याला कारणीभूत आहे. हृदयरोग टाळण्यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्य सर्वात महत्वाचे आहे. आरोग्यासाठी पूरक असे पर्याय निवडून राहणीमानात बदल आवश्यक आहे.
ही काळजी घ्याच
पहिल्यांदा हृदयविकाराचा हा त्रास होतो तेव्हा ओळखण्यासाठी हृदयवेदनेची जागा व स्वरूप महत्त्वाचे असते. ही कळ छातीच्या मध्यभागापासून निघून डाव्या हाताच्या छातीलगतच्या बाजूला येते. याच्याबरोबर दम लागणे,घाम, इत्यादी त्रास असतो. मात्र योग्य निदान होण्यासाठी तज्ज्ञाकडून तपासणी आवश्यक आहे. त्याचप्रमाणे दररोज ३० मिनिटे वॉक, जॉगिंग, स्विमिंग आणि सायकलिंग सुद्धा दिलासा देणाऱ्या कसरती ठरू शकतात. जिम करताना सुद्धा डॉक्टरांची देखरेख आणि त्यानुसार आहार खूप महत्वाचा आहे. योग आणि ध्यान साधना केवळ शारीरिक नव्हे, तर मानसिक आरोग्यासाठी सुद्धा पोषक आहेत.
Mumbai Heart Attack Caner Patient Daily Deaths