इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पावसाळा आणि खड्डे हे नेहमीचेच समीकरण झाले आहे. कारण एरवी सुद्धा प्रवास करताना हे खड्डे प्रचंड त्रास देतात, मग पावसाळ्यात तर बघायलाच नको. पावसाळ्यात प्रवास करायचा म्हटलं की खड्ड्यांची समस्या आ वासून समोर उभी असते. वाहनचालकांना याचा सामना करताना मोठा त्रास होतो. याबाबत प्रशासन कायम सुस्त असल्याचे दिसून येते. मुंबई – गोवा महामार्गावर हा त्रास तर सर्वाधिक असतो. सगळ्या यंत्रणा सपशेल झोपेत असल्याचे चित्र येथे नेहमीच दिसते. आणि प्रवाशांना होणार त्रास नेहमीचा झाला आहे. यावर आता मनोरंजन विश्वातील कलाकार देखील त्रागा करू लागले आहेत. पावसाळ्यात कोकणात जायचं असेल तर रस्ते इतके खराब आहे की वेळेवर पोहोचणं शक्यच नाही. कोकण स्वर्गाइतकं सुंदर आहे, पण रस्ता खूप कठीण आहे असं खोचक विधान ‘पुष्पक विमान’ फेम मराठी अभिनेत्री गौरी किरणने एक व्हिडीओ शेअर करून म्हटलं आहे.
अभिनेत्री गौरी किरण ही मूळची कोकणातील वेरळ गावची. मुंबईहून कोकणात गावी जाताना तिला देखील हे खड्डे चुकले नाहीत. तेव्हा तिने मुंबई – गोवा महामार्गावरील खड्डे दाखविण्यासाठी हा व्हिडीओ बनवला आणि चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. मुंबई – गोवा मार्गाची दुरवस्था तिने या व्हिडीओतून दाखवली आहे.“कोकण हा खरंच स्वर्ग आहे, कारण स्वर्गात जायचा रस्ता जितका कठीण असतो तितकाच कोकणात जायचा रस्ता कठीण आहे,” असं तिने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
मुंबई – गोवा महामार्ग हा कोकणातल्या विकासाचा मार्ग समजला जातो. मात्र एका तपापेक्षा जास्त काळ या महामार्गचे काम सुरूच आहे. हा मार्ग रखडल्याने कोकणात गावी जाणाऱ्या नागरिकांना या खड्ड्यांचा सामना करावा लागतो. यावरच अभिनेत्री गौरी हिने व्हिडीओ करून पोस्ट केला आहे. तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. ‘रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते हाच मोठा प्रश्न आहे’, ‘मराठी कलाकार सुद्धा अशा सामाजिक प्रश्नावर बोलतात तेव्हाच आपल्या महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा विकास होईल कारण सरकारी प्रतिनिधी या गोष्टींमध्ये लक्षच घालत नाही. कलाकरांच्या मदतीने तरी सामान्य माणसाला न्याय मिळेल,’ अशी प्रतिक्रिया एकाने दिली आहे. एक चंद्रयान मोहीम तिकडे पण होऊन जाऊद्या.. खड्ड्यांचं परीक्षण करायला तर चंद्रावर देखील असेच खड्डे असतील अशा प्रतिक्रिया काही चाहत्यांनी व्हिडीओवर दिल्या आहेत.
mumbai goa highway road potholes video
marathi actress gauri kiran bad condition traffic