अलिबाग (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई-गोवा महामार्गाचे काम यावर्षीच्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, ज्यामुळे महाराष्ट्रातील कोकण विभागाच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पनवेल तालुक्यातील खारपाडा येथे केले.
कोकणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र.66 मुंबई ते गोवा या महामार्गावरील पनवेल ते कासू (लांबी 42.300 कि.मी. आणि मूल्य 251.96 कोटी) या रस्त्याचे काँक्रिटीकरण, राष्ट्रीय महामार्ग क्र.965 डीडी राजेवाडी फाटा ते वरंध गाव (लांबी 13 कि.मी. आणि मूल्य 126.73 कोटी) व राष्ट्रीय महामार्ग क्र.965 डीडी वरंध गाव ते पुणे जिल्हा हद्द (लांबी 8.60 कि.मी. आणि मूल्य 35.99 कोटी ) या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासह दुपदरीकरण करणे, अशा एकूण 63.900 किलोमीटर लांबी व एकूण 414.68 कोटी मूल्य असलेल्या या तीन प्रकल्पांचा भूमीपूजन सोहळा कार्यक्रम त्यांच्या हस्ते खारपाडा टोल प्लाझाजवळ, खारपाडा गाव,ता.पनवेल येथे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनिल तटकरे, राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड-रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार रवींद्र पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी खासदार रामशेठ ठाकूर, प्रसिद्ध व्यावसायिक जे.एम.म्हात्रे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, मुंबई विभागाचे क्षेत्रीय अधिकारी अंशुमाली श्रीवास्तव, मुख्य अभियंता श्री.शेलार, पनवेल प्रांताधिकारी राहुल मुंडके, पेण प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, पनवेल तहसिलदार विजय तळेकर, पेण तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे आदि मान्यवर उपस्थित होते.
श्री.गडकरी म्हणाले, भूसंपादन, परवानग्या, कंत्राटदारांच्या अडचणी यासारख्या समस्यांमुळे कोकण विभागातील अनेक कामांना अनंत अडचणी येत होत्या, मात्र आता भारत सरकारच्या केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने ही जबाबदारी स्वीकारली आहे.
यावेळी त्यांनी 13,000 कोटी रुपयांच्या मोरबे-करंजाडे रस्त्याच्या बांधकामाची घोषणा केली, जो जवाहरलाल नेहरू बंदरातून जाईल आणि मुंबई ते दिल्ली अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ 12 तासांपर्यंत कमी करेल.
1,200 कोटी रुपयांच्या कळंबोली जंक्शन आणि 1,146 कोटी रुपयांच्या पागोटे जंक्शनचे कामही लवकरच सुरू होईल, असेही ते म्हणाले.
श्री.गडकरी म्हणाले की, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम यावर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, ज्यामुळे कोकण क्षेत्राच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. “मुंबई-गोवा महामार्ग महाराष्ट्राच्या कोकणातील 66 पर्यटनस्थळांना स्पर्श करतो. त्यातून विकासाला मोठी चालना मिळेल. या महामार्गाचे काम पूर्ण होण्याने कोकणातील फळे आणि इतर उत्पादनांची जलद वाहतूक देखील होईल. त्यातून व्यवसायास चालना मिळेल.
रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने या कामासंबंधी 2011 मध्ये बांधकामासाठी दोन स्ट्रेच देण्यात आलेल्या संबंधित कंत्राटदारांना या कामातील दिरंगाईसाठी जबाबदार धरले. आता सर्व प्रकरणे निकाली निघाली आहेत.
आता महामार्गाचे 11 टप्प्यांत बांधकाम व रुंदीकरण करण्यात येणार आहे. जेएनपीटी आणि दिघी बंदर यांना जोडणारा महामार्ग देशाच्या प्रगतीला निश्चित हातभार लावेल” असा विश्वास व्यक्त करून त्यांनी राज्य सरकारांना 6-8 इंच टॉपिंग असलेले रस्ते बनविण्यास प्राधान्य देण्यास सांगितले, जेणेकरुन हे रस्ते किमान 50 वर्षे टिकतील, तसेच दुरुस्तीसाठी कमी खर्च येईल.
“भारतात वर्षाला 5 लाख रस्ते अपघात होतात, ज्यापैकी 1.5 लाख प्राणघातक असतात, त्यापैकी बरेच जण 18-34 वयोगटातील मृत पावतात. हे त्रासदायक आहे. याबाबत गंभीर दखल घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगून अपघातांना आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत, असे ते म्हणाले.
Interacting with media on the progress of Mumbai-Goa National Highway (NH-66) in Ratnagiri. #MumbaiGoaHighway #PragatiKaHighway #GatiShakti https://t.co/GY7K6oF8bv
— Nitin Gadkari (मोदी का परिवार) (@nitin_gadkari) March 30, 2023
श्री. गडकरी म्हणाले की, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय वाहतुकीला अडथळा आणणारे टोल नाके न ठेवता महामार्गांवर उपग्रह-आधारित भाडे संकलन सुरू करण्याच्या प्रक्रियेत आहे.
रायगड जिल्हा विकासाकडे जाणारा जिल्हा आहे. तसेच कोकणातील सर्व खासदार, मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी मिळून कोकणच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घ्यावा. सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करावा, शासन, लोकसहभाग आणि खाजगी संस्था अशा एकत्रित गुंतवणुकीतून कोकणातील अनेक विकास कामे होऊ शकतात, असे आवाहन करून येथील जलशक्तीचा वापर करून पर्यटन आणि दळणवळणाच्या उद्देशाने लांबच लांब समुद्रकिनारा लाभलेल्या कोकण प्रदेशासाठी सी प्लेन, हॉवरक्राफ्ट आणि वॉटर टॅक्सी सिस्टिमच्या व्यवहार्यतेचा महाराष्ट्र राज्याने अभ्यास करावा. या पर्यायांना लवकरात लवकर प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करायला हवे, त्यासाठी माझ्याकडूनही सर्व प्रकारचे सहकार्य दिले जाईल. त्यातून आपल्या देशाचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या या कोकणचा पर्यटन व औद्योगिक दृष्टीने निश्चितच विकास होईल. यामुळे स्थानिक युवकाला रोजगार मिळेल,असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने खासदार श्रीरंग बारणे,खासदार सुनिल तटकरे, राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण,आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी यांची समयोचित भाषणे झाली. या सर्वच मान्यवरांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची कामाप्रति असलेली निष्ठा सर्वांनीच आदर्श घ्यावा,अशी असल्याचे मत व्यक्त करून मुंबई-गोवा महामार्गाचे काम त्यांनी जिद्दीने हाती घेतल्याबाबत त्यांचे आभार व्यक्त केले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत 414.68 कोटी किमतीच्या 63.900 किलोमीटर लांबीच्या तीन प्रकल्पांचे भूमीपूजन डिजिटल पद्धतीने संपन्न झाले. त्यानंतर या प्रकल्पाची सविस्तर माहिती देणारी ध्वनीचित्रफित सर्वांना दाखविण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अंशुमाली श्रीवास्तव यांनी केले. आभार प्रदर्शन यशवंत घोटकर यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक कुणाल रेगे यांनी केले.
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाची आज पाहणी केली. या प्रकल्पाची एकूण १० पॅकेजेसमध्ये विभागणी करण्यात आली आहे.#PragatiKaHighway #GatiShakti #MumbaiGoaHighway pic.twitter.com/snQNMAPZ36
— Nitin Gadkari (मोदी का परिवार) (@nitin_gadkari) March 30, 2023
Mumbai Goa Highway Minister Nitin Gadkari Aerial View