ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबईसह उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ झाली आहे. दररोज काही ना काही घटना घडत आहेत. विशेषतः विनयभंग, बलात्कार, महिलांवर हल्ले तसेच तिचा निर्घृण खून करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यातच साकीनाका परिसरातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रिक्षातून प्रवास करत असतानाच प्रियकर आणि प्रेयसीमध्ये काही किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला, की प्रियकराने प्रेयसीच्या गळ्यावर चाकूने सपासप वार केले. या भयानक घटनेत ३० वर्षीय प्रेयसीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
गळ्यावर फिरवला धारदार चाकू…
याबाबत अधिक माहिती अशी की, एक विवाहित महिला ( वय ३० ) आपल्या पतीसोबत पटत नसल्याने संघर्षनगर येथे आपल्या आईकडे राहत होती. महिलेला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. काही महिन्यापूर्वी दीपक बोरसे यांच्यासोबत तिचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते. काही दिवस ते एकत्र गोडीगुलाबीत फिरत होते, मात्र काही कारणांमधून त्यांचे अलीकडे वारंवार खटके उडत होते. त्यातच सोमवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास आरोपी दिपक आणि त्याची ती ( विवाहीत ) प्रेयसी साकीनाका परिसरातून एका रिक्षातून जात होते. दोघांमध्ये काही किरकोळ कारणावरून धावत्या रिक्षातच शाब्दिक वाद झाला. त्यानंतर त्याचे चकमकीचं रुपांतर वादात झाला. वाद इतका विकोपाला गेला की, आरोपी दीपक याने प्रेयसीच्या गळ्यावरुन धारदार चाकू फिरवला. त्यात ती जागीच ठार झाली असून या घटनेमुळे रिक्षाचालक ही घाबरून गेला.
आरोपी फरार
साकीनाका परिसरात रिक्षातच महिलेवर सपासप वार केल्याने ती जागीच ठार झाली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सदर घटना बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती, परंतु या संधीचा फायदा घेऊन आरोपी तेथून निसटला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून तातडीने तपासाची गती वाढवत त्याला अटक केली. याप्रकरणी साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून नेमके आरोपी दीपक बोरसे यांने या महिलेची हत्या का केली ? या घटनेचा उलगडा करण्यासाठी कसून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, आरोपीला कठोर शिक्षा करावी, अशी मागणी महिलांनी केली असून आता महिलांना मुंबई शहर व परिसरात दिवसाढवळ्या फिरणे देखील मुश्किल झाले आहे का ? अशी विचारणा होत आहे.