मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले दिसून येते. विशेषतः महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ झालेली आढळते. त्यातच अल्पवयीन मुली, तरुणी आणि महिलांचा विनयभंग किंवा बलात्काराच्या घटना वाढल्याने त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे. मलबार हिल परिसरात एका अभियंत्याने एका १७ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याचे समोर प्रकरण उघड झाले आहे. याप्रकरणी अभियंता इंद्रजित गुहनेओगी (वय २९) या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
न्यूरोसायकॉलॉजी ज्ञानाचा गैरवापर…
विशेष म्हणजे पोलीस तपासात इंद्रजितने धक्कादायक खुलासे केले आहेत. इंद्रजितने न्यूरोसायकॉलॉजी ज्ञानाचा गैरवापर करुन तरुणीशी मैत्री केली. त्यानंतर समुपदेशनच्या नावाखाली तरुणीवर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. पीडित तरुणीचा आईशी वाद झाल्यानंतर रात्री १० वाजता रागाच्या भरात घरातून निघून गेली होती. तरुणी मरीन ड्राईव्ह येथे रडत बसली असताना आरोपी इंद्रजित गुहनेओगी याने तिला पाहिलं. न्यूरोसायकॉलॉजी ज्ञानाचा गैरवापर करून इंद्रजितने पीडित तरुणीला विश्वासात घेतलं. समुपदेशनच्या बहाण्याने पीडितेला इंद्रजितने मदतीचे आश्वासन दिले. यानंतर तरुणीने आपला मोबाइल क्रमांक इंद्रजितला दिला आणि ती घरी परतली. दुसऱ्या दिवशी तरुणीने इंद्रजितला व्हॉट्सअॅप मेसेज करत समुपदेशन केल्याबद्दल आभार मानले. तेव्हाच इंद्रजितने संधी साधत तरुणीला समुपदेशनासाठी मलबार हिल येथील घरी भेटण्यास बोलावले. तीन दिवसांनी तरुणी इंद्रजितच्या घरी गेली. तेव्हा इंद्रजितने पीडित तरुणीवर बलात्कार केला. यानंतर तरुणीने घाबरून इंद्रजितचा नंबर ब्लॉक केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
आरोपीला अटक
आपल्याला त्या तरुणाने फसवले हे पीडित तरुणीच्या लक्षात आले. परंतु आता काय करावे ? हे तिला सूचेना त्यातच घरात ती शांत आणि गप्प राहू लागल्याने तिचे बदललेले वर्तन पाहून आईला संशयाला आले. त्यानंतर आईने तिला विचारणा केली असताना पीडितीने आपबिति सांगितली. त्यानंतर तरुणीचे सांगण्यावरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी इंद्रजितला अटक केली आहे. इंद्रजित हा मूळचा पश्चिम बंगालमधील रहिवाशी असून तो लष्कर भरतीसाठी प्रयत्न करत होता. पण, त्यात वारंवार अपयश आले. त्यातच तो न्यूरोसायकॉलॉजीचा अभ्यासही इंद्रजित करत होता. मागील वर्षी इंद्रजितची ओळख मलबार हिल येथील एका फॅशन डिझायनर महिलेशी झाली. सोशल मीडिया आणि न्यूरोसायकॉलॉजी अभ्यासाचे ज्ञान पाहून ही महिला इंद्रजितवर प्रभावित झाली. यानंतर महिलेने इंद्रजितला डिजिटल मार्केटर म्हणून नोकरीची ऑफर दिली. तसेच, ही महिला इंद्रजितच्या घराचे ५५ हजार रुपये भाडे भरत होती, अशी माहिती समोर आली असून या तरुणाने आणखी काही तरुणांची फसवणूक केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.