मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रातील मोठ्या संस्थांची कार्यालये, उद्योग गुजरातेत पळविण्याची मोहीम गेल्या दोन-तीन वर्षांपासून सुरू आहे. यामध्ये आता हिरे व्यापाराची भर पडणार की काय, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सूरत येथील हिरे सराफा बाजाराचे उद्घाटन करणार आहेत. त्यामुळे गुजरातमध्ये आता हिऱ्यांच्या व्यापाऱ्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार असून त्याचा सर्वाधिक फटका मुंबईला बसण्याची शक्यता आहे.
मोदी करणार उदघाटन
राज्यातील मोठे उद्योग पळविण्याची सर्कस सुरू असतानाच आता हिरे बाजारसुद्धा गुजरातला नेण्याची भीती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरता लक्षात घेता विविध राज्ये स्वत:कडे उद्योग आकर्षित करताहेत. यात गुजरात अग्रस्थानी आहे. अशात मोदींनी सुरत येथे हिरे बाजाराचे केलेले उद्घाटन नव्या परिवर्तनाची नांदी ठरण्याची अपेक्षा आहे. सध्या सूरत आणि मुंबई या ठिकाणांहून हिरे बाजार सक्रिय आहे. पूर्वी मुंबई हे हिरे बाजाराचे मुख्य केंद्र होते. सूरत हिरे सराफा बाजार या ठिकाणी हिऱ्यांवरील कटिंग, पॉलिशिंग, व्यापार, संशोधन यासारख्या प्रक्रिया एकाच जागी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ज्यामुळे मुंबईतील हिरे उद्योग सूरतमध्ये स्थलांतरित होईल असे सांगितले जाते.
बीकेसीमधील व्यवसाय
हिऱ्यांवरील प्रक्रिया करण्याचा मुख्य उद्योग सध्या मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल येथे आहे. बीकेसीमध्ये हिरे व्यापारासाठी आणि आंतरराष्ट्रीय खरेदीदारांसाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत. हिरे उद्योगाशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, मुंबईमध्ये सध्या जागेची मोठी कमतरता भासत आहे. तसेच रिअल इस्टेटचे भाडेही महागले आहे. त्याशिवाय मुंबईत व्यापार होणाऱ्या हिऱ्यांचा मोठा भाग सूरतमध्ये उत्पादित केला जातो. तिथून स्थानिग अंगडिया ट्रेनमधून हिरे घेऊन मुंबईत येतात. या प्रवासासाठी किमान साडे चार तासांचा वेळ जातो. परिणामत: भविष्यात हा संपूर्ण उद्योग गुजरातेत गेल्यास आश्चर्य वाटू नये, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
एकाच संकुलात संपूर्ण इंडस्ट्री
एसडीबीमध्ये १५ मजल्यांच्या नऊ इमारती आहेत. संकुलात एकूण ४,२०० छोटी-मोठी कार्यालये आहेत, ज्याचे क्षेत्रफळ ३०० चौरस फुटांपासून ते ७५ हजार चौरस फूट इथपर्यंत असण्याची शक्यता आहे. हिऱ्यांशी संबंधित अनेक बाबी आणि पायाभूत सोयीसुविधा जसे की, कच्च्या हिऱ्यांची आणि पॉलिश्ड हिऱ्यांची विक्री, हिऱ्यांचे उत्पादन करणाऱ्या प्रयोगशाळा, हिऱ्यांच्या निर्मितीसाठी उपयोगी पडणारे सॉफ्टवेअर, हिरे प्रमाणपत्र वितरीत करणाऱ्या कंपन्या इत्यादी हिरे व्यापारासाठी पूरक असणाऱ्या इतर बाबी एकाच संकुलात उपलब्ध होणार आहेत.
व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम
मुंबईमधील हिरे व्यापाऱ्यांनी याआधीच एसडीबीमध्ये कार्यालय बुक केले आहे. एसडीबीमध्ये सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्या, तरी सूरत शहरातील दळणवळणांशी निगडीत सुविधांबाबत अनेकांना साशंकता आहे. सूरतमध्ये सात तारांकित (सेव्हन स्टार) हॉटेल्स नाहीत आणि इतरही अनेक निर्बंध असल्यामुळे मुंबईतील व्यापारी सूरतमध्ये आपला संपूर्ण व्यवसाय हलविण्यास कचरत आहेत.