धुळे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – धुळेकरांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. खासकरुन गेल्या अनेक वर्षांची धुळेकरांची मागणी आता पूर्ण झाली आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच धुळे येथून मुंबई जाण्यासाठी शनिवारपासून थेट रेल्वे सुरु होणार आहे. यापूर्वी दादर अमृतसर एक्सप्रेस व महाराष्ट्र एक्सप्रेसला धुळेसाठी बोग्या आरक्षित करून जोडल्या जात होत्या. आता स्वतंत्र रेल्वेच धावणार आहे.
धुळे -मुंबई एक्सप्रेस गाडी शनिवार २९ एप्रिलपासून सुरू होणार यावेळी रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. जास्तीत जास्त संख्येने प्रवाश्यांनी उपस्थीत रहावे असे आवाहन भाजपतर्फे करण्यात आले आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रवाशांचे स्वागत करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारचे आभार व्यक्त केले जाणार आहे.
गौरव ट्रेनही
रेल्वे मंत्री ना. रावसाहेब दानवे पाटील यांच्या हस्ते पुणे येथून पर्यटन विकासासाठी विविध वैशिष्टे असलेली लोकप्रिय ठरलेली भारत गौरव ट्रेन सुरु होणार आहे. या गाडीला नाशिक, मनमाड, चाळीसगाव व भुसावळ असे थांबे देण्यात आले आहे.