इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – विश्वचषकात भारत – पाकिस्तान यांच्यात सामना होणार, हे कळलं आणि क्रिकेटप्रेमींची उत्सुकता आतापासूनच शिगेला पोहोचली आहे. १५ ऑक्टोबरला होणाऱ्या भारत – पाकिस्तान सामन्यासाठी आतापासूनच विमानांची तिकिटे महागली आहेत. तिकिटांच्या किमती आताच चांगल्या चढल्या आहेत.
विश्वचषक २०२३ चे यजमानपद भारताकडे आहे. या स्पर्धेत १५ ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तानमधील सामना म्हणजे सर्वच क्रिकेटप्रेमींसाठी एक वेगळे आकर्षण असते. हा सामनाही तितकाच अटीतटीचा आणि रोमांचक होतो. त्यात जर विश्वचषकातील सामना असेल तर उत्सुकता अधिकच शिगेला पोहोचते. क्रिकेटप्रेमींनी आतापासूनच १५ ऑक्टोबरसाठी हा सामना पाहण्यासाठी आतापासूनच तयारी करायला सुरुवात केली आहे. आता या सामन्यासाठी विमान भाडेही वाढले आहे. १४ ऑक्टोबर म्हणजेच सामन्याच्या एक दिवस आधी, दिल्ली-अहमदाबाद आणि मुंबई-अहमदाबाद मार्गावरील विमान तिकिटांच्या किमतीत वाढ झाली आहे.
भारत-पाकिस्तान विश्वचषक क्रिकेट सामन्यामुळे अहमदाबादचे विमान भाडे वाढले आहे. ही दरवाढ एवढी आहे की, प्रमुख शहरांमधील भाडेवाढ ३५०% टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. क्रिकेट चाहते आणि प्रायोजक आधीच सामन्यासाठी त्यांचे हॉटेल आणि ट्रॅव्हल बुकिंग करत आहेत. चेन्नई ते अहमदाबाद प्रवासासाठी आता १५ जुलै रोजी तीन महिने अगोदर बुक केलेले असतानाही नॉन-स्टॉप फ्लाइटसाठी प्रति व्यक्ती ४५,४२५ रुपये मोजावे लागत आहेत. या प्रवासासाठी क्वचितच एवढे पैसे मोजावे लागले असतील. या प्रवासासाठी साधारणतः १०,००० रुपये खर्च येतो. मुंबई आणि दिल्ली सारख्या जवळपासच्या गंतव्यस्थानांवर देखील या तारखांसाठी अनुक्रमे ३३९% आणि २०३ टक्क्याने भाडे वाढले आहे.
सध्या, दिल्ली ते अहमदाबाद आणि मुंबई ते अहमदाबाद हवाई तिकिटांचे भाडे १५,००० ते २२,००० दरम्यान आहे. ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष वीरेंद्र शाह यांनी सामन्याच्या दिवसांमध्ये जास्त मागणी असल्याने अहमदाबादला जाणाऱ्या विमान भाड्यात वाढ झाल्याचे सांगितले. भारत-पाकिस्तान सामन्यासाठी प्रचंड उत्साह आहे. एकूणच, अहमदाबादमधील सामन्यासाठी हॉटेल बुकिंग आणि तिकिटांसाठी मोठ्या प्रमाणावर चौकशी सुरू आहे,” असे ते म्हणाले.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबद्दल बोलताना, EaseMyTrip चे सीईओ आणि सह-संस्थापक निशांत पिट्टी म्हणाले, “या सामन्याची घोषणा झाल्यापासून एका रात्रीसाठी हॉटेलचे दर ५ पटीने वाढले आहेत. लक्झरी हॉटेल्स प्रति रात्र ५०,००० पर्यंत आकारत आहेत आणि हे फक्त हॉटेल्सच नाही तर फ्लाइट तिकीटही वाढत आहेत. लोकांनी तीन महिने अगोदर बुकिंग केले तरी विमान भाडे सामान्यपेक्षा सहा पटीने महाग असते. ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील इकॉनॉमी क्लाससाठी दिल्ली-अहमदाबाद तिकिटाची किंमत सुमारे ३००० असेल. पण त्याच तिकिटाची किंमत सामन्याच्या एक दिवस आधी २०,००० रुपये असेल.”