पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संपूर्ण देशाला कोरोनाच्या कठीण काळात लस पुरविणारे पुनावाला कुटुंब गेल्या आठ वर्षांपासून एका कारणाने केंद्र सरकारसोबत संघर्ष करीत आहे. कोरोनाच्या काळात देशवासीयांची सेवा केल्याबद्दल केंद्र सरकारने ज्या पुनावाला यांना २०२२ मध्ये पद्मभूषण दिला, त्यांना आठ वर्षांपासून एका घराचा ताबा देण्यासाठी मान्यता मिळत नाहीये. त्यामुळेच हा संघर्ष सुरू आहे.
सीरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पुनावाला आणि सीईओ अदर पुनावाला यांनी २०१५ मध्ये अमेरिकन सरकारकडून मुंबईतील लिंकन हाऊस खरेदी केले होते. ७५० कोटी रुपये मोजून पुनावाला यांनी मुंबईतील हा शाही बंगला आपल्या नावावर करून घेतला. पण हा परिसर संरक्षण खात्याच्या अख्त्यारित येतो. आणि पुनावाला यांना गृहप्रवेश करायचा असेल तर संरक्षण खात्याचा हिरवा कंदील आवश्यक आहे. पण अद्याप त्यांना हिरवा कंदील मिळालेला नाही.
त्यामुळे गेल्या आठ वर्षांपासून त्यांचा गृहप्रवेश रखडलेला आहे. अमेरिकन सरकारने आवश्यक नोटीस न देताच करार करून घराची विक्री केली. त्यामुळे या कराराला मान्यताही मिळालेली नाही. अश्यात दोन वर्षांपूर्वी देशासाठी हिरो असलेले पुनावाला सध्या सरकारसोबत एका व्यक्तिगत कामासाठी भांडत आहेत. प्रशासकीय अडचणींमुळे पुनावाला यांचा गृहप्रवेश रखडल्यामुळे त्यांच्यासोबत या संघर्षात अमेरिकेतील सरकारदेखील आहे, हे विशेष.
हेरिटेज प्रॉपर्टी
मुंबईतील मलबार हिल परिसरात लिंकन हाऊस आहे. ब्रिच कँडी रुग्णालयाच्या अगदी शेजारीच हा बंगला आहे. ५० हजार स्क्वेअर फूट परिसरात पसरलेली ही वास्तू ग्रेड तीनची हेरिटेज प्रॉपर्टी मानली जाते. केंद्र सरकारने हेरिटेज वास्तूंची ग्रेड एक, दोन आणि तीनमध्ये विभागणी केलेली आहे. जेणेकरून त्या त्या वास्तूचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्व जाणून त्याचे संवर्धन करता येईल. ग्रेड तीनच्या वास्तू स्थापत्यशास्त्र, सौंदर्यशास्त्र आणि सामाजिक हिताच्या दृष्टिकोनातून शहरासाठी महत्त्वाच्या असतात.
पूर्वीचे ‘वांकानेर हाऊस’
संयुक्त महाराष्ट्र होण्यापूर्वी मुंबई आणि गुजरातचा काही भाग बॉम्बे प्रांतात येत असे. सध्या गुजरातमध्ये असलेले वांकानेरदेखील तेव्हा बॉम्बे प्रांतात होते. १९३३ मध्ये वांकानेरचे शेवटचे महाराज महाराणा अमरसिंह झल्ला यांनी ‘वांकानेर हाऊस’ या नावाने या वास्तूची उभारणी केली. १९५७ मध्ये वांकानेरच्या राजाने हा बंगला अमेरिकन सरकारला ९९९ वर्षांच्या भाडेपट्ट्याने दिला. वांकानेरच्या संस्थानिकांना कर भरण्यासाठी आर्थिक मदत व्हावी, यासाठी हा बंगला भाडेपट्ट्याने देण्यात आला होता. अमेरिकेने या ठिकाणी स्वतःचे दूतावास कार्यालय स्थापले आणि बंगल्याचे नाव ‘लिंकन हाऊस’ असे ठेवले होते.
Mumbai Cyrus Poonawala Bungalow PM Narendra Modi