मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (सीएसएमटी) एक मोठा बदल होऊ घातला आहे. या बदलामुळे रेल्वे व्यवस्थापनासह प्रवाशांना देखील फायदाच होणार आहे. या बदलाच्या दृष्टीने काम सुरू झाले असून लवकरच त्याची अंमलबजावणी झालेली दिसणार आहे.
सीएसएमटीवर एकूण १८ प्लॅटफॉर्मस असून त्यातील ७ लोकलसाठी आणि ११ लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी आहेत. येथून लांब पल्ल्याच्या ९० गाड्या रोज सुटतात. अश्यात ११ प्लॅटफॉर्म्सपैकी १०, ११, १२ आणि १३ क्रमांकांचे प्लॅटफॉर्म बरेचदा मोठ्या गाड्यांसाठी उपयोगाचे नसतात. कारण १० आणि ११ नंबरच्या प्लॅटफॉर्मवर १३ डब्यांची आणि १२ आणि १३ नंबरच्या प्लॅटफॉर्मवर १७ डब्यांची गाडी उभी राहू शकते. त्यामुळे इतर प्लॅटफॉर्म्सवर ताण येतो. कारण याठिकाणी २४ डब्यांची गाडी उभी राहू शकत नाही.
लांब पल्ल्याच्या बऱ्याचशा गाड्या २४ डब्यांच्या आहेत. त्यामुळे आता या चारही प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्याचे काम सुरू झाले आहे. भविष्यात या प्लॅटफॉर्म्सवरूनही २४ डब्यांच्या गाड्या धावू शकणार आहेत. चार प्लॅटफॉर्म्सचे विस्तारीकरण पूर्ण झाल्यास इतर टर्मिनसवरील एक्सप्रेसची वाहतूक सुरळीत करणे सोयीस्कर होणार आहे.
तसेच मुंबई ते पुणे धावणाऱ्या एक्सप्रेसच्या डब्यांच्या संख्येत वाढ करता येणे मध्य रेल्वेला शक्य होणार आहे. प्लॅटफॉर्म नंबर १० आणि ११ची लांबी २९८ मीटर असून ती आता ६८० मीटपर्यंत वाढविण्यात येणार आहे. तर, फलाट क्रमांक १२ आणि १३ ची लांबी ३८५ मीटर असून ती ६९० मीटपर्यंत वाढवण्यात येणार आहे.
असा होणार लाभ
हे काम पूर्ण झाल्यानंतर, या सर्व प्लॅटफॉर्म्सवर २४ डब्यांच्या एक्सप्रेस उभ्या राहू शकणार आहेत. यासोबतच मध्य रेल्वेवरून कोकणात, दक्षिण आणि उत्तर भारतात जाणाऱ्या एक्सप्रेसच्या डब्यांमध्ये वाढ होणार आहे.
Mumbai CSMT Railway Station Big Changes