मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबईतील एका दाम्पत्याने आपल्याच नवजात बाळाविषयी असे काही पाऊल उचलले की त्यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यांनी घृणास्पद पाऊल उचलल्यामुळे पोलिसांनीही कारवाई करण्यात कसर सोडणार नाही, असे म्हटले आहे.
मंगळवारी (१ ऑगस्ट) मध्यरात्री इमरान व रहनुमा या दाम्पत्याने आपल्या दोन दिवसांच्या बालकाचे रिक्षातून अपहरण झाल्याची तक्रार जुहू पोलिसांत दिली. वॉशरुमला जाण्याच्या कारणाने रिक्षा थांबवण्यास सांगितले. परत आल्यानंतर बाळ रिक्षात नव्हते, असे त्यांनी तक्रारीत म्हटले. जुहू पोलिसांनी तपासास सुरुवात करुन त्यांच्या शेजाऱ्यांकडे देखील चौकशी केली. यात शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रहनुमा खान हिची २९ जुलै रोजी राहत्या घरी प्रसुती झाली. तिने मुलाला जन्म दिला. परंतु दोन दिवसानंतर नवजात बालक दिसून आले नाही म्हणून शेजाऱ्यांनी त्यांच्याकडे चौकशी देखील केल्याचे पोलिसांना सांगण्यात आले.
त्यानंतर तपास पथकाने संबंधित दाम्पत्याचीच कसून चौकशी केली. चौकशीतून भयानक सत्य पुढे आले. जन्मदात्यांनीच आपल्या नवजात बालकाला सांताक्रूज पश्चिम इथल्या खिरा नगर इथे पार्क केलेल्या रिक्षामध्ये सोडून दिल्याचे कबूल केले. यानंतर गुन्हे प्रकटीकरण पथकाने सांताक्रूज पोलिसांना संपर्क साधला असता ३० जुलै रोजी ऑटोरिक्षामध्ये नवजात बालक सापडले असल्याचे समजले. यासंदर्भात सांताक्रूज पोलीस ठाण्यात दाम्पत्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यानंतर जुहू पोलिसांनी इमरान खान आणि रहनुमा खान यांना सांताक्रूज पोलिसांच्या ताब्यात दिले. तर बाळाची प्रकृती व्यवस्थित असून त्याला देखरेखीसाठी भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हलाखीची परिस्थिती
मुंबईच्या जुहू गल्ली परिसरातून ही घटना समोर आली. जुहू गल्ली परिसरात राहणाऱ्या या दाम्पत्याने आपल्याच दोन दिवसांच्या नवजात बाळाचे रिक्षातून अपहरण झाल्याची तक्रार जुहू पोलीस ठाण्यात दिली. आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने दाम्पत्याने हे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.
mumbai crime couple left infant baby in auto rikshaw
Police Investigation Kidnapping arrest juhu