मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आजच्या काळात कोण काय गायब करेल हे सांगता येत नाही परदेशात चोरट्यांनी एक विमानच गायब केले होते. आणि ते चक्क भंगारात विकणार होते, तसेच आपल्या देशात देखील बिहार – पश्चिम बंगाल भागात एक रेल्वेच गायब झाली होती आणि ती भंगाराच विकण्याचा प्रयत्न चोरटे करत होते, असाच एक प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे , चक्क एक लोखंडी भव्य पूल चोरट्यांनी गायब केल्याचे आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. विशेष म्हणजे सीसीटीव्ही फुटेज मध्ये हा पुल कसा गायब झाला, हे निदर्शनास आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे यात एक कर्मचारी सहभागी होता त्याच्यासह तिघांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
चौघांना अटक..
मालाड पश्चिम परिसरात नाल्यावर ठेवलेला सहा हजार किलो वजनाचा लोखंडी पूल चोरल्याच्या आरोपाखाली बांगुरनगर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. याप्रकरणी अदानी कंपनीने तक्रार दाखल केली होती. अधिक तपासात पोलिस कंपनीच्या एका कर्मचाऱ्याकडे जाऊन पोहोचले. त्याला पूल बांधण्याचे कंत्राट देण्यात आले होते. त्यानुसार पोलिसांनी गेल्या आठवड्यात कर्मचारी आणि त्याच्या तीन साथीदारांना अटक केली. मात्र अशा प्रकार घडल्याने आता याची वरिष्ठ पातळीवर चौकशी होणार आहे.
आदानी कंपनीने तयार केला
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जवळपास ९० फूट लांबीचा हा पूल होता. अदानी वीज कंपनीने मोठ्या आकाराच्या तारांची ने आण करण्यासाठी तो तयार केला होता. मात्र, हा तात्पुरता पुल गायब झाल्याचे आढळून आल्याने वीज कंपनीने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी जवळपासच्या भागात बसवलेल्या कॅमेऱ्यांचे फुटेज स्कॅन केले. त्यात ११ जून रोजी एक मोठे वाहन पुलाच्या दिशेने जात असल्याचे दिसले. त्यानंतर पोलिसांनी नोंदणी क्रमांकावरून वाहनाचा माग काढला. वाहनातील गॅस कटिंग मशीनचा वापर करत पूल तोडून लोखंडाची चोरी करण्यात आली. मुंबई शहरात असेच अनेक प्रकार घडतात, विशेषतः रेल्वेचे लोखंडी सामान गायब होण्याचे प्रकार नेहमीच घडत असतात.