मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशाला अनेक प्रतिभावंत क्रिकेटपटू देणाऱ्या बहुचर्चित मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक जाहीर झाल्यानंतर पडद्यामागच्या हालचालींना प्रचंड वेग आला होता. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा बड्या नेतेमंडळींचा अध्यक्षपदासाठी अमोल काळे यांना पाठिंबा होता. तर काळे यांच्या विरोधात एकेकाळाचे प्रसिद्ध क्रिकेटपटू संदीप पाटील अध्यक्ष पदासाठी उभे होते, त्यामुळे निवडणूक चर्चेची होणार असे वाटत असताना मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी अमोल काळे यांची निवड झाली आहे.
एमसीएचा अध्यक्ष कोण होणार? याची साऱ्यांनाच उत्सुकता होती. खरे म्हणजे आत्तापर्यंत आयसीसी, बीसीसीआय आणि एमसीएवर राजकारण्यांची हुकुमत होती. खेळातील सत्ताकेंद्रावर आपलीच सत्ता असावी यासाठी दिग्गज राजकारण्यांनी आपले राजकारणातले सगळे डावपेच खेळातही वापरून महत्वाच्या या पदांवर निवडणुका जिंकल्या होत्या, मात्र लोढा कमिटीच्या शिफारशीनंतर खेळातील सत्ताकेंद्रावरील राजकारण्यांची प्रत्यक्ष हुकमत जवळपास संपुष्टात आली आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनमधील दिग्गज दावेदार शरद पवार आणि आशिष शेलार यांनी आपलीच माणसे या पदावर निवडली जावीत, यासाठी पडद्यामागून बऱ्याच हालचाली सुरू केल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या विरोधात उभे असलेले टिम इंडियाचा १९८३ वर्ल्ड चॅम्पियन माजी खेळाडू संदीप पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. अमोल काळे यांना १८३ मते मिळाली तर संदीप पाटील यांना १५० मते मिळाली. अमोल काळे हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी मानले जातात.
खरे म्हणजे बऱ्याच वर्षांनंतर संदीप पाटील हे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षदासाठी उभे होते. मात्र शरद पवार आणि आशिष शेलार यांनी या बैठकीत काही गोष्टी सांगितल्या होत्या.
संदीप पाटील यांचे व्याही भारताचे माजी क्रिकेटपटू सलिल अंकोला आहेत. ते स्वत: मुंबईच्या निवड समितीवर आहेत. त्यामुळे संदीप पाटील अध्यक्ष झाल्यास परस्पर हितसंबंध जपले जातील, असा आरोप करण्यात आला होता. मात्र अंकोला हे संदीप पाटील यांच्याबरोबर जातील असे वाटत असतानाच, सलिल अंकोला हे शरद पवार आणि आशिष शेलार यांच्या बैठकीला उपस्थित राहिल्याने निवडणुकीलाचे चित्र पालटले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे इतर नेत्यांबरोबर वानखेडे मैदानावरील गरवारे क्लबमध्ये एकत्र आले होते, यावेळी फडणवीस आणि पवारांचा एमसीएच्या कार्यक्रमाअंतर्गत विजयासाठीचा प्लॅन ठरवण्यात आला होता.
निवडणुकीसाठी शरद पवार आणि आशीष शेलार यांनी संयुक्त पॅनल उभे केले होते, त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर तसेच, फडणवीस यांच्या खास मर्जीतील अमोल काळे व बहुजन विकास आघाडीच्या अजिंक्य नाईक यांचा समावेश होता. त्यानंतर निवडणुकीमध्ये शरद पवार आणि आशिष शेलार यांच्या गटाने एकत्र येत पॅनल उभे केले होते. त्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशन वर पुन्हा एकदा शरद पवार यांचेच वर्चस्व राहील असे म्हटले जात आहे.
Mumbai Cricket Association Election Result Politics
MCA Sports