मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विविध कारणांमुळे वादग्रस्त असलेल्या रझा अकादमीच्या इफ्तार पार्टीत मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे हे अधिकाऱ्यांसह सहभागी झाल्याची बाब समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणी यांनीच ही बाब उघडकीस आणली असून यानिमित्ताने त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. त्यामुळे या प्रश्नावरुन भाजपसह अन्य पक्षांकडूनही राज्य सरकारला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न होणार असल्याचे दिसून येत आहे.
नितेश राणे यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, ही तीच रझा अकादमी आहे जिने आझाद मैदानातील अमर जवान मूर्ती तोडली, महिला पोलिसांशी गैरवर्तन केले, भिवंडी आणि अन्य ठिकाणी झालेल्या कारवायांमध्येही रझा अकादमीचा सहभाग आहे. देशविरोधी कारवाया करणाऱ्या रझा अकादमीच्या इफ्तार पार्टीत सहभागी होऊन पोलिस आयुक्त का संदेश देत आहेत, रझा अकादमीच्या कार्याला एकप्रकारे हे प्रोत्साहन आहे का, महाविकास आघाडी सरकारचे नेमके धोरण काय आहे. विधिमंडळात गृहमंत्री सांगतात की, आम्ही रझा अकादमीवर बंदी घालण्याच्या विचारात आहोत आणि पोलिस आयुक्त थेट या अकादमीच्या इफ्तार पार्टीला जातात, हे म्हणजे नेमकं काय चालले आहे, असा संतप्त सवाल राणे यांनी केला आहे. दरम्यान, याप्रश्नी राज्यातील राजकारण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत.
बघा, आमदार नितेश राणे यांचा हा व्हिडिओ
— nitesh rane ( Modi ka Parivar ) (@NiteshNRane) April 18, 2022